स्थानिकांचा विरोध डावलून धारावीत सर्वेक्षण; अदानी 700 जणांची टीम कामाला लावणार

टीडीआर घोटाळा करून आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनव्&िकास प्रकल्प मिंधे सरकारने अदानीच्या घशात घातल्यानंतर आता अदानी समूहाने या प्रकल्पाला गती देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. स्थानिकांचा विरोध डावलून येत्या काही दिवसांत धारावीत सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. सर्वेक्षणाचे काम झटपट उरकण्यासाठी अदानी समूह जवळपास 700 जणांची टीम कामाला लावणार आहे.

धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे, अशी स्थानिक रहिवाशांसह शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भूमिका आहे. मात्र धारावीकरांना 350 चौरस फुटांचे घर देण्यात येईल, असे अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) या विशेष हेतू पंपनीने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मिंधे सरकार आणि अदानी विरोधात धारावीकरांमध्ये संतापाची लाट आहे. अशातच आता अदानी समूह सर्वेक्षणाची तयारी करत आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. सर्वेक्षणासाठी सुमारे सातशे जणांची टीम तयार केली आहे. यात अदानी समूहाचे तसेच सरकारी कर्मचारी असणार आहेत, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प कार्यालयाने दिली आहे.

सर्वेक्षणातील तपशिलाच्या आधारावर पंपनी रहिवाशांना पात्र -अपात्र ठरवणार आहे. 2000 पूर्वी राहणाऱया धारावीकरांना मोफत घरे देण्यात येणार आहेत. 2000 ते 2011 या काळात येथे येऊन स्थायिक झालेल्यांना घरासाठी बांधकाम खर्च द्यावा लागणार आहे.

बायोमेट्रिक्स पद्धतीने डेटा गोळा करणार
पावसाळय़ापूर्वी धारावीतील सर्वेक्षण पूर्ण करण्याचा अदानी समूहाचा प्रयत्न आहे. अदानी समूहाची पंपनी घरोघरी जाऊन बायोमेट्रिक्स पद्धतीने धारावीकरांचा डेटा गोळा करणार आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱयाला टॅब देण्यात येणार आहेत. टॅबच्या माध्यमातून झोपडीधारकांचे अर्ज भरले जातील, वीज बिल वगैरे अपलोड केले जातील. सर्वेक्षणाचे व्हिडीओ शूटिंगदेखील केले जाणार आहे. तसेच डिस्टोमीटरच्या सहाय्याने झोपडीच्या मूळ क्षेत्रफळाची मोजणी केली जाईल, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प कार्यालयाने दिली.