भाजपच्या पथ्यावर पडणारे मत विभाजन बौद्ध समाजाने टाळावे! पँथर-रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांचे आवाहन

कुठलाही आंबेडकरवादी, बहुजनवादी पक्ष राज्यात स्वबळावर जिंकणे आणि मोदी आणि भाजपला एकटय़ाने पराभूत करू शकत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बौद्ध समाजाने भाजपच्या पथ्यावर पडणारे आपल्या निर्णायक मतांचे विभाजन टाळावे आणि महाविकास आघाडीच्या प्रबळ उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन ज्येष्ठ पँथर-रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांनी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. लोकसभा निवडणुकीत देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्याचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे. मोदी आणि भाजपला रोखणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पँथर नेते सयाजी वाघमारे, माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर, संजय अपरांती, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे उपस्थित होते.

बौद्ध समाजाच्या एकजुटीच्या निर्णायक मतांची ताकद ही नव्याने दाखवण्याची गोष्ट राहिलेली नाही. आंबेडकरी समाजाने आपल्या मतांची उपयुक्तता आजवर अनेकदा सिद्ध केले आहे. आपल्या मतांची विभागणी टाळून आंबेडकरी समाज घडवेल आणि भाजपला रोखेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

गटातटापेक्षा लोकशाही मोठी
काही आंबेडकरवादी, बहुजनवादी गट-संघटनांनी केवळ पक्षीय अस्तित्वासाठी या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या अस्तित्वाला प्राधान्य देऊन माघार घ्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.

विदर्भातील 80 संघटनांचा पाठिंबाविदर्भातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आंबेडकरी समाजाची भाजपच्या पथ्यावर पडणारी मतविभागणी टाळण्यासाठी थोर विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, डॉ. सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखाली 80 संघटनांनी जनजागृती केली होती. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला असून भाजपच्या पराभवासाठी राज्यभरात हे काम आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सर्वत्र जोरात सुरू केले आहे, असे गायकवाड म्हणाले.