आजोबांची हत्या करणाऱ्या  नातवाची सुटका; सत्र न्यायालयाचा निकाल

77 वर्षीय आजोबांनी 5 हजार रुपये परत मागितल्याच्या रागातून त्यांची हत्या करणाऱ्या 21 वर्षीय नातवाला सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले. वडाळा येथे फेब्रुवारी 2022मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी सुशांत राम सातपुते याला क्राईम ब्रँचने पनवेल रेल्वे स्थानकावरून अटक केली होती.

सुशांतने पैसे वेळीच परत करण्याचे आश्वासन देत आजोबा लक्ष्मण घुगे यांच्याकडून पाच हजार रुपये उसने घेतले होते. मात्र काही महिने उलटूनही पैसे दिले नाहीत. त्यामुळे आजोबांनी विचारणा केल्यानंतर वाद झाला आणि सुशांतने आजोबांची हत्या केल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता. तथापि, हत्येचा आरोप सिद्ध करणारे सबळ पुरावे नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला. खटल्यात सुशांतची बाजू मांडण्यासाठी ‘दर्द से हम दर्द तक’ संस्थेतर्फे अॅड. प्रकाश साळशिंगीकर आणि अॅड. अनुपकुमार पाल यांनी मोफत कायदेशीर सहाय्य केले, तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रंजना बुधवंत यांनी काम पाहिले. उभय पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.