मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुलुंड-ठाणेदरम्यानचे नवे रेल्वे स्थानक लटकले

 

 

ठाणे स्थानकात होणारी गर्दी कमी करण्यासाठी मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाजवळ नवे रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्य सरकारने मनोरुग्णालयाची जागा रेल्वेला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र मिंधे सरकारने अद्याप सदरची जागा न दिल्यानेच स्थानकाच्या कामाचे घोडे अडल्याचे समोर आले आहे.

मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान सुमारे अडीच ते तीन किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे या प्रवासाला सात ते आठ मिनिटांचा वेळ लागतो. तसेच मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यानच्या रहिवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचताना गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर मनोरुग्णालयाला लागून रेल्वे स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारने रुग्णालयाची जागा रेल्वेला हस्तांतरित केल्याशिवाय पुढे जाता येणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले होते. तसेच सध्या मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनीही ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान नवे स्थानक उभारणार असल्याचे आश्वासन दिले होते, मात्र गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री असलेल्या मिंध्यांनी रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जागा दिलेली नाही. त्यामुळे स्थानकाची पुढील कार्यवाही सुरू होऊ शकलेली नाही. याबाबत मध्य रेल्वेकडे विचारणा केली असता जोपर्यंत राज्य सरकार जागा उपलब्ध करून देत नसल्याने पुढील कार्यवाही होऊ शकलेली नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी दिली.