…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

राज्यात आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी पक्ष पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना पळवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर राष्ट्रवादी पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजित पवारांना सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी करण्यात आलं आहे. मात्र अजित पवार यांनी मला मुख्यमंत्री व्हायचं असल्याचं जाहीर सभेत सांगितलं आणि आता तर भाजपच्या एका बड्या नेत्यानंच अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मिंधे गटाची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.

भाजपचे नेते संजय काकडे यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली. ‘आता जर आमच्या वरिष्ठांनी आणि त्यांच्या नेतृत्त्वाचं काही ठरलं असेल आणि ज्याचे जास्त आमदार निवडून येतील तोच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. परंतु, काही वेळ, काही प्रसंग असे येतात की पक्षश्रेष्ठींना निर्णय घ्यावे लागतात की खालच्या लेव्हलनं जे शब्द दिलेले असतात ते जर शब्द दिले असतील तर आणि त्यांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेटवर्क चांगलं आहे, त्याचा भाजपला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे वरिष्ठांनी शब्द दिले असतील तर मला काही त्यात गैर वाटत नाही’, असं संजय काकडे म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांसह आठवडाभरापूर्वी शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खाते वाटप झालेले नाही. त्यामुळे भाजप – मिंधे गट- अजित पवार गट यांच्यात सारं काही आलबेल दिसत नाही अशी चर्चा आहे. अजित पवार गटाच्या भाजप नेते फडणवीसांसोबत बैठका सुरू आहेत. मात्र अद्याप काही तोडगा निघालेला नाही.