जन्मदिनानिमित्त पार्टीचे साडेतीन लाख बिल झाले, टीटीएमएम करायला सांगितल्याने तुफान राडा

वाढदिवसाला आपल्या मित्रमैत्रिणींना हॉटेलमध्ये नेऊन पार्टी देण्याची पद्धत जगभर पाहायला मिळते. मात्र एका तरुणीने आपल्या मित्र-मैत्रिणींना हॉटेलमध्ये जेवायला नेलं आणि अवाच्या सवा बिल आल्यानंतर तिने टीटीएमएम(तुझे तू, माझे मी) बिल भरूया असं सांगितलं. यामुळे तिच्या मैत्रिणी तिच्यावर जाम संतापल्या आणि त्यानंतर हॉटेलमध्येच तमाशा झाला.

व्हिक्टर नावाच्या एका टीकटॉक वापरणाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला आतापर्यंत 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार एका तरुणीने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी दिली होती. या पार्टीचं बिल साडेतीन लाख रुपये झाले. बिल पाहून डोळे पांढरे झालेल्या बर्थडे गर्लने सगळ्यांनी मिळून बिल भरूया असं सांगितलं. यावर तिच्या मित्र मैत्रिणींनी आक्षेप घेतला. इतरांनी भरपेट खाल्लं आम्ही एखादं पेय मागवलं. आम्ही इतरांऐवढे पैसे का द्यायचे असा सवाल या पार्टीला हजर असलेल्या व्हिक्टरने केला. त्याला अन्य काही जणांनीही पाठिंबा दिला. यावरून पार्टीमध्ये जबरदस्त शाब्दीक राडा झाला.

या पार्टीनंतर मी माझ्या ‘त्या’ मैत्रिणीशी बोलतो मात्र आमची पूर्वीसारखी मैत्री राहिली नाही असं व्हिक्टरने म्हटलं आहे. आम्ही तिसरीपासूनचे मित्र आहोत. मात्र आमची मैत्री या पार्टीनंतर तुटली असं त्याने म्हटलंय. व्हिक्टरचं म्हणणं आहे की त्याने या पार्टीमध्ये स्प्राईट आणि कालामारी नावाचं पेय मागवलं होतं. या दोन्हीची किंमत 2051 रुपये इतकी होते. इतर जण मात्र भरभरून जेवायला मागवत होते, मग मी त्यांच्या जेवणाचे पैसे का देऊ असा प्रश्न व्हिक्टरने विचारला आहे.