सत्ताधाऱ्यांच्या ‘भेटी’ वाढल्या पण ‘गाठी’ काही सुटेनात! मंत्रिमंडळ विस्तार आणि ‘खाते’ वाटपावरून मंत्र्यांच्या बैठकांवर बैठका

ajit-pawar-shinde-fadnavis

राज्यात सत्ताधाऱ्यांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आठवडा उलटून गेला तरी प्रश्न सुटताना दिसत नाही. आपल्याला ‘वजनदार’ खातं मिळावं यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ असल्याचं कळत आहे. तर दुसरीकडे मिंधे गटातील नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तार हवा आहे, त्याबरोबरच पालकमंत्री पदावरूनही गोंधळ कायम आहे. यासगळ्यात 2019मध्ये राज्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या आमदारांच्या मात्र काहीच हाती लागत नसल्यानं त्यांच्या गोटात कमालीची नाराजी आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू असून नेते वरिष्ठांच्या भेटी घेत आहेत, मात्र तरी देखील प्रंचड गुंतागुंतीच्या राजकारणानं पडलेल्या गाठी सुटताना दिसत नाही, अशी स्थिती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. दोन तास ही बैठक चालली होती. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होत आहे. काही खात्यांसाठी त्यांची आग्रही मागणी आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा याची चर्चा सुरू आहे.

देवगिरी बंगल्यावर आज पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीसाठी अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे. खातेवाटपासंदर्भात ही बैठक असल्याचं बोललं जात आहे.

तिकडे शिवसेना पक्षप्रमुखांशी गद्दारी करून पक्ष पळवण्याचा प्रयत्न करणारा मिंधे गट राष्ट्रवादीच्या सोबत येण्यानं प्रचंड अडचणीत आला असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार ही त्यांची आग्रही मागणी आहे. मंत्रिपदासाठी आशेवर बसलेल्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर खाली मान घालून जाण्यासारखी स्थिती उत्पन्न झाली आहे. त्यामुळे ते आता मागण्यांवर अडून बसले आहेत. भरत गोगावले यांनी तर पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल, असा धमकीवजा इशारा दिला आहे. तर त्याचवेळी मंत्रिपद उपभोगत असलेले मिंधेगटाचे मंत्री मात्र सारं ठीक आहे, तिघांमध्ये समन्वय असल्याचं बोलवून झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, अजित पवारांना अर्थ खाते देऊ नये असं मिंधेगट आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्य़ा पक्षाच्या नेत्यांचं मत असल्याचं कळतं आहे. खुद्द बच्चूकडू यांनीच तशी माहिती दिली. सगळ्यांचा अजित पवारांना अर्थमंत्री करण्यास विरोध आहे. त्यांनी पुन्हा मागच्यावेळी सारखं केलं तर अडचणी वाढतील त्यामुळे सगळ्यांचा त्यांना विरोध आहे, असं कडू म्हणाले आहेत. ते अर्थमंत्री झालं तर कुणी सहन करणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.