गृहमंत्री फडणवीस लापता आहेत! उद्धव ठाकरे यांचा मिंधे सरकारवर जोरदार प्रहार

शिवसैनिकाने पोलीस स्टेशनमध्ये एखाद्याच्या कानफटात मारली असती तर देवेंद्र फडणवीसांनी थयथयाट आणि आकांडतांडव केला असता. ‘बघा कशी गुंडागर्दी चाललीय… पोलीस स्टेशनमध्ये मारामारी केली’ अशी ओरड केली असती, मग आता महाराष्ट्रात उघडपणे गुंडागर्दी सुरू असताना, भाजपचा आमदार पोलीस ठाण्यात गोळय़ा झाडत असताना गृहमंत्री फडणवीस कुठे आहेत? मी ऐकलंय ते लापता आहेत. कारण त्यांना तोंडच उरलं नाही उत्तर द्यायला, असे जबरदस्त तडाखे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

उद्धव ठाकरे यांचा झंझावाती जनसंवाद दौरा सुरू आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आज राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथे उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी तुफान गर्दी उसळली होती. शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या कोकणच्या जनतेच्या साक्षीनेच उद्धव ठाकरे यांनी मिंधे- भाजपमधील गँगवॉर, सरकारच्या इशाऱयावरून तपास यंत्रणांकडून सूडबुद्धीने केल्या जात असलेल्या कारवाईचा समाचार घेतला.

निष्ठावंतांची पाठ थोपटायला आणि गद्दारांच्या पाठीत लाथ घालायला आलोय अशा वाक्याने उद्धव ठाकरे यांनी राजापूरच्या जवाहर चौकातील सभेला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने आणि शिवसेनेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. सत्ताधाऱयांच्या तालावर नाचणाऱया शासकीय नोकरशाहीला, दिवस बदलत असतात हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

लाचारांनो, सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी सरळ करू

गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार राजन साळवी यांची चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी तपास पथक त्यांच्या घरी पोहचले होते. त्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी या वेळी घेतला. ‘‘मी यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱयांना सांगतोय, दिवस बदलत असतात. दुर्दैवाने आज भाजपचे, मिंध्यांचे दिवस आहेत. पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचेही दिवस फिरतील हे लक्षात ठेवा. त्यांचे दिवस फिरले तर तुमचे दिवस आणखी वाकडे होतील. सरकार येते आणि जाते. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. लांडग्यासारखी तुम्ही कोणाची लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी सरळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही,’’ असा सज्जड दमच उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱयांना दिला.

मी लढायला उभा आहे तो माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी असे उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जात, पात, धर्म असे सगळं विसरून एकत्र येऊया व देशावरचे संकट दूर करूया, तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणण्याचा अधिकार राहील, असे आवाहनही त्यांनी केले.

‘नस्ते’ उद्योग मंत्री लाचारी करून शिवसेनेत आले

रत्नागिरी येथील आठवडा बाजारात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर शरसंधान केले. उद्योग मंत्र्यांचे सगळे नस्ते उद्योग रत्नागिरीकरांना माहिती आहेत, अशी टीका करतानाच उदय सामंत यांच्या लाचारीचा पाढाही त्यांनी वाचला. बाळासाहेब होते तेव्हा सामंत हे शिवसेनेविरुद्ध लढत होते आणि 2014मध्ये लाचारी करून शिवसेनेत आले होते, अशी टीका त्यांनी केली. त्या वेळी शिवसेनेने सामंत यांना म्हाडाचे अध्यक्ष पद म्हणजे राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. 2019ला गरज नव्हती, पण शब्द दिला होता म्हणून पुन्हा मंत्री बनवले आणि पळून गेले, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला. उपस्थित जनसमुदायाला उद्धव ठाकरे यांनी विचारले की, त्या गद्दाराचे करायचे काय म्हटले तर तुम्ही म्हणता, खाली डोकं वर पाय. पण ज्याला डोपंच नाही आणि त्याचे डोके कुठले पाय कुठले हेच कळत नाही, अशा बिनडोक माणसाचे करायचे काय हा प्रश्न आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामंत यांच्यावर टीका केली.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आजही भाजप आणि मिंधे सरकारवर जहरी टीका केली. आमदाराला हातात पिस्तूल घ्यावे लागते, भर पोलीस ठाण्यात जाऊन भाजपचा आमदार गोळीबार करतोय, हे रामराज्य नाही मरा राज्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता कमळाबाईवाले नुसते हतबल झालेले नाहीत तर संपले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

गणपत गायकवाड यांनी आरोप केला की मिंध्यांकडे त्यांचे करोडो रुपये आहेत. मग गणपत गायकवाड काय बोलले याची दखल का नाही घेत? सत्ताधारी आमदाराला काही किंमत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. या सर्व घटनेनंतर गृहमंत्री कुठे आहेत? देवेंद्र फडणवीस दिसलेत का कुठे? लापता आहेत. कारण त्यांना उत्तर द्यायला तोंडच नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली की अशा हजारो घटना घडतात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे की, तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतो आणि तो ज्याच्यावर आरोप करतो तो गद्दार तुम्ही डोक्यावर बसवलाय, असेही उद्धव ठाकरे गरजले.

गुजरातची चाकरी करणाऱया गद्दारांना शिवरायांचे नाव घ्यायचा अधिकार नाही

महाराष्ट्रात येणारे उद्योग मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेले. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंध्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने आणलेला वेदांता फॉस्कॉन मिंधे सरकारने गुजरातला नेला. बल्क ड्रग पार्क कुठे नेला? गुजरातला… टाटा एअर बस… गुजरात, फिल्म फेअर… गुजरात. क्रिकेटची मॅच… गुजरातला. गद्दार कुठे गेले… गुजरातला! अरे, गुजरातची चाकरी करणाऱया गद्दारांनो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे कडाडले.

पंतप्रधान गुजरात आणि देशात फूट पाडताहेत

गुजरातींबद्दल मला असूया नाही, द्वेष नाही. मात्र कळत-नकळत आपले पंतप्रधान गुजरात आणि देशामध्ये फूट पाडत आहेत. गुजरात आणि देशामध्ये एक द्वेष निर्माण करत आहेत हे फार घातक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वतःचे उद्योग जोरात सुरू असून त्यांनी उद्योग मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात किती उद्योग आणले? डावोसला गेला होतात तिथे काय केलात? आपल्या इथूनच पंपन्या घेऊन गेले आणि तिथे जाऊन करार केला. तुमच्या सोबत डावोसला कोण गेले होते त्यांची नावे सांगा? डावोसचा दौरा खासगी होता मग खासगी दौऱयाची ‘खाज’ का सुटली हे पण सांगा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

रामराज्याचा आरंभ कल्याणमधून गोळीबाराने

संकल्पपूर्तीचा प्रारंभ रामराज्याचा आरंभ… अशा आशयाच्या भाजपच्या बॅनरचा उद्धव ठाकरे यांनी या वेळी दाखला दिला. या रामराज्याचा आरंभ भाजपच्या आमदाराने कल्याणमध्ये केला, असा टोला त्यांनी लगावला. भाजपचा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतो, त्या आमदाराच्या मुलाला पोलीस ठाण्यात धक्काबुक्की होते आणि पोलीस धक्काबुक्की करणाऱयाला काहीही करत नाहीत. मग तो आमदार गोळीबार करतो. हेच जर एखाद्या शिवसैनिकाने पोलीस ठाण्यात कुणाच्या कानफटात मारली असती तर यांनी किती थयथयाट केला असता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या या जनसंवाद दौऱयामध्ये सौ. रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते व सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, राजापूरचे आमदार राजन साळवी, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, कुडाळचे आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी आमदार गणपत कदम, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, लोकसभा महिला संघटक नेहा माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, विक्रांत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भवानीशंकरा, देशावरचं आणि महाराष्ट्रावरचं अरिष्ट दूर कर, उद्धव ठाकरे यांचे धूतपापेश्वराला साकडे

उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी श्री देव धूतपापेश्वराचे दर्शन घेतले. भवानीशंकरा, देशावरचं आणि महाराष्ट्रावरचं अरिष्ट दूर कर, तुझ्या दर्शनाला परत येईन असे साकडे यावेळी उद्धव ठाकरे यांनी घातले.

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होवोत असे गाऱहाणे यावेळी ग्रामस्थांनी घातले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण कसा वागतोय याचा लेखाजोगा देव ठेवत असतो. मी पुन्हा मुख्यमंत्री होवो असे साकडे तुम्ही घातले, पण माझी तशी इच्छा आधीही नव्हती आणि आताही नाही. जे धर्माच्या नावाने पापं करताहेत, त्यांचा पूर्ण नायनाट कर. पापं करणाऱया माणसांना राजकारणातून कायमचे नष्ट करून टाकले पाहिजे. देव आपले ऐकल्याशिवाय राहणार नाही.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जवळपास 17 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी 11 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यातून मंदिराचे काम सध्या सुरू आहे. त्याचे सादरीकरणही यावेळी दाखवण्यात आले.

राजन साळवी यांचा शिवसेनेला अभिमान

उद्धव ठाकरे यांनी राजापूर येथील सभेमध्ये आमदार राजन साळवी यांच्यावर काwतुकाची स्तुतिसुमने उधळली. राजन साळवी हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. संकटाच्या काळात जो साथ देतो त्यावरून आपले कोण आणि परके कोण हे कळते असे सांगत राजन साळवी यांचा आपल्याला अभिमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राजापूर येथील जवाहर चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांचे भव्य स्वागत झाले. यावेळी शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी उपस्थित होते.

बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना विचारा

याच मुद्दय़ावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. बाळासाहेब त्या खुर्चीवर बसायचे तेव्हा त्यांनी मोदींना वाचवले नसते तर मोदींना त्यांची खुर्ची मिळाली नसती आणि हेच नतद्रष्ट त्या खुर्चीची किंमत लावताहेत. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना विचारा आणि मोदींना जर जाण असेल तर ते त्या खुर्चीची किंमत सांगतील. कारण त्या खुर्चीची किंमत होणारच नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. गुजरातच्या दंगलींनंतर वाजपेयी मोदींना काढून फेकणार होते, पण बाळासाहेबांनी आडवाणींना सांगितले, मोदी गया तो गुजरात गया. त्या बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत करता असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. सत्ता बदलू द्या, मग ज्यांनी ही किंमत केली त्याची किंमत दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला. तुमच्या आईवडिलांची किंमत केली तर? तुमची किंमत किती? असा सवाल करतानाच, माझ्या वडिलांची किंमत मिंध्यांना कळली, पण भाजपला नाही कळली आणि मिंध्यांना त्यांच्या वडिलांची किंमत कळाली नाही म्हणून माझा बाप चोरताहेत, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

बिनडोक लोकांचे काय करणार?

उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना या गद्दारांचं करायचं काय अशी घोषणा शिवसैनिकांनी दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही काय म्हणणार गद्दाराचं करायचं काय…खाली डोपं वर पाय. पण ज्यांना डोकचं नाही.ज्यांचे पाय कुठे आणि डोपं कुठे हेच कळत नाही अशा बिनडोक लोकांचे काय करणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

पुराच्या आठवणी जागवल्या

चिपळूणला पूर आला होता तेव्हा मी स्वतः इथे आलो होतो. सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. लोकांमध्ये उद्वेग होता. मी मुंबई महानगरपालिका, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा चिपळूणला पाठवली. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. वीज गेल्याने ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचे जीव गेले. ते मनाला लागलं म्हणून भूमिगत वीजवाहिन्यांसाठी 3200 कोटी रुपये चिपळूणसाठी मंजूर केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगताना पुराच्या आठवणी जागवल्या.

शेखर निकम गोडबोल्या

आमदार शेखर निकम जर महायुतीत राहिले असते तर आगामी निवडणुकीत सवा लाखाच्या मताधिक्याने निवडून आले असते. कारण काय माहितीय, शेखर निकम एक नंबरचे गोडबोल्या आहेत. त्यांनी गोड बोलून सर्वांना एकत्रच करून ठेवले होते. आता सांगतात, विकासासाठी गेलो. शेखर निकम तुम्ही समोर या, जी कामे सुरू आहेत ती महाविकास आघाडीच्या काळातील आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी टीका केली.

भाजपच्या सात पिढय़ा आल्या तरी शिवरायांच्या मूर्तीची किंमत करता येणार नाही

राजन साळवी यांच्या घरातील मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली. ती यादीच यावेळी उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवली. ‘या यादीवर सुशांत चव्हाण नावाच्या व्यक्तीची सही आहे. चव्हाण मराठी वाटतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार लावली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पह्टो आणि खुर्ची दहा हजार रुपये’, असा संताप व्यक्त करतानाच, तुमच्या सात पिढय़ा आल्या तरी त्याची किंमत करता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

मुस्लीम बांधवांनी मराठी कुराण भेट दिले, हेच आमचे हिंदुत्व

उद्धव ठाकरे यांनी आजही भाजपच्या बेगडी हिंदुत्वावर प्रहार केला. धर्माधर्मात आगी लावणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही तर देशासाठी तयार असलेले हिंदुत्व आम्ही मानतो असे ते म्हणाले. शिवसेनेच्या हिंदुत्वावर कुणीही शंका घेऊ नये असे बजावतानाच, रायगडातील मुस्लीम बांधवांनी मराठीतील कुराण आपल्याला भेट दिले, हेच आमचे हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

इच्छुक उमेदवार पैसे उधळतायत, त्यांच्या घरांवर धाडी टाका

राजन साळवी यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचा अॅण्टी करप्शनचा दावा आहे, मग राजापुरातून निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार आहेत ते अमाप पैसा उधळत आहेत, बेहिशेबी खर्च करत आहेत, त्यांच्या घरी आधी धाडी टाका. त्यांच्याच नाही तर त्यांच्या भावाच्या संपत्तीचीही चौकशी करा, असे खुले आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि मिंधे सरकारला दिले.

आजपासून निवडणूक आयोगाचे नाव ‘धोंडय़ा’

चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला, पण पक्षाचे नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. माझ्या पक्षाचे शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी दिले आहे. ते बदलण्याचा अधिकार निवडणूक आयुक्तांना नाही. जर त्यांनी ते केले तर आम्ही निवडणूक आयोगाला धोंडय़ा म्हणू. निवडणूक आयोगाचे नाव धोंडय़ा ठेऊ, अशी मार्मिक टीका उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. प्रदीप कुरूलकर याच्याविषयीही भाजपवाले बोलत नाहीत. तो देशद्रोही असेल तर त्याला भरचौकात फाशी द्या, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

कमळाबाई हतबल झाली नाही तर पूर्ण संपली आहे. भाजप म्हणजे बाहेरची जनता पार्टी असे तिचे नाव झाले आहे. किती नावे ठेवू… भेकड जनता पार्टी, भाकड जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, भाडय़ाची जनता पार्टी, भ्रष्टाचारी जनता पार्टी, जुगारी जनता पार्टी… मकाऊला जाऊन जुगार खेळतात हे यांचे रामराज्य.

घरात माणसं घुसवून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची किंमत करता, आमच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची किंमत करता. सत्ता एकदा बदलूच द्या. ज्यांनी शिवराय आणि बाळासाहेबांची किंमत केली त्यांना त्यांची किंमत आणि लायकी काय हे आम्ही दाखवून देऊ.