शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यापीठाचे निकाल रखडले, राज्य सरकारची विधान परिषदेत कबुली

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) आणि विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये नियमित तसेच तासिका तत्त्वांवरील शिक्षकांची कमतरता असल्यामुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वेळ लागत असल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे.

विधान परिषदेत आमदार विलास पोतनीस आदींनी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल आणि नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या निकालांना होत असलेल्या विलंबाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात नियमित शिक्षकांच्या कमतरतेमुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनासाठी विलंब होत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या एम.कॉम. सत्र-4 च्या अभ्यासक्रमाची परीक्षा मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये झाली होती, मात्र या परीक्षेचा निकाल विद्यापीठाने सात महिन्यांनंतर 17 नोव्हेंबरला जाहीर केला. तसेच बीएड अभ्यासक्रमाची द्वितीय सत्राची परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये पार पडली होती. या परीक्षेचा निकाल नऊ महिन्यांनी 7 ऑगस्टला जाहीर करण्यात आला, तर एम.कॉम सत्र-3 च्या परीक्षेचा सात महिन्यांनी जाहीर केला. दरम्यान, एम. ए. सत्र-4 च्या परीक्षेला चार महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही, असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

बीएड अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात नियमित तसेच तासिका तत्त्वावरील शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेत होऊ शकले नाही. त्यामुळे बीएड अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करायला तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी लागल्याची कबुलीही लेखी उत्तरात देण्यात आली आहे. दरम्यान, उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकन जलदगतीने होण्यासाठी विद्यापीठाने संलग्नित कॉलेजांतील प्राचार्य आणि शिक्षकांची सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी दिली. परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यासाठी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी नोंद करणे, उत्तरपुस्तिकेवर क्यूआर कोडचा वापर यासारख्या उपाययोजना केल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आल्याचेही लेखी उत्तरात म्हटले आहे.