कल्याण लोकसभेतील मतदारांच्या मनामनात मशाल; वैशाली दरेकर यांचा प्रचार जोरात

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांच्या मनामनात मशाल चिन्ह आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपनेते आणि संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांनी व्यक्त केला. कल्याण पूर्वेतील कार्यकर्ता मेळाव्यात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दरेकर यांच्या विजयाचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक कल्याण पूर्वेतील शुक्ला स्पोर्ट्स क्लब गणेशवाडी येथे झाली. यावेळी गुरुनाथ खोत म्हणाले, विरोधी उमेवारासोबत कितीही मित्रपक्ष असले तरी मित्रपक्षांना श्रीकांत शिंदे यांनी दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते शिंदे यांना साथ देणार नाहीत. वैशाली दरेकर यांना सर्व भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरीही प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले मशाल हे निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी सक्रिय राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

उपनेते विजय साळवी, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालंडे, माजी महापौर रमेश जाधव, जगदीश लोहळकर, राधिका गुप्ते, भाऊ म्हात्रे, अशोक म्हात्रे, नारायण पाटील, शहरप्रमुख शरद पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरामोठ्यांचा आशीर्वाद हेच बळ

मतदारसंघातील शहरे आणि ग्रामीण भागातून आपणास चांगला पाठिंबा मिळत असल्याचे वैशाली दरेकर यांनी यावेळी सांगितले. थोरामोठ्यांनी आपणास दिलेले शुभाशीर्वाद हे कधीही परत घेता येत नसतात. त्यांच्या आशीर्वादाच्या बळामुळे आपला विजय नक्की असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.