उमेद – व्यसनमुक्तीसाठी समर्पित जीवन

>> प्रा. वर्षा चोपडे 

व्यसनाधीनतेच्या गुलामीत अडकणे अतिशय सोपे आहे, परंतु त्यातून बाहेर पडून पुन्हा नव्याने व्यसनमुक्त जीवनाची स्रुवात करून कायमचे व्यसनमुक्त राहणे प्रचंड अवघड आहे.  तुषार नातू यांचा असाच प्रवास घडला. त्यांनी दारूमुक्ती आणि नशामुक्ती कार्यासाठी स्वतला झोकून दिले आहे. मैत्रेयी व्यसनमुक्ती केंद्राद्वारे तुषार नातू आणि सहकारी तळमळीने देश दारूमुक्त व्हावा आणि दारूडय़ांचे संसार सुखी व्हावे याकरता झटत आहेत.

हिंदुस्थानात दारू व मादक व्यसनामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. सुमारे 2000 इस.पूर्व वैदिक कालखंडातील भारतीय प्राचीन साहित्यात, विविध पेयांमध्ये इथेनॉल असल्याचा उल्लेख आढळतो. त्यात दोन प्रकारचे पेय नमूद केले होते, सोमा आणि सुरा. सोमा हे सामाजिक उच्चभ्रूंचे पेय आहे मानले जायचे तर सुरा हे तांदूळ किंवा उसापासून बनवलेले आंबवलेले पेय आहे. भारतीय मद्यपान आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरले जायचे. कोण आणि कोणत्या परिस्थितीत मद्यपान करू शकते हे परिभाषित करण्यासाठी कठोर नियम होते आणि त्याचे पालन केले जायचे. ब्रिटिशांच्या काळात हळूहळू दारू पिण्याचे प्रमाण वाढले. त्यानंतर चांगली किण्वन प्रािढया, पॅकेजिंग आणि नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि परिणामी अल्कोहोलयुक्त पेय हे व्यावसायिक उत्पादन बनले. सरकारने मोठय़ा डिस्टिलरींना परवाने देऊन स्थानिक अल्कोहोलयुक्त पेये तयार करण्यास परवानगी दिली. आता त्याचा अतिरेक झाला आहे. दारू पिण्याचे कारण कौटुंबिक समस्या, आरोग्य समस्या किंवा नातेसंबंधातील समस्या आहे असे सांगितले जाते. तर कुतूहल म्हणून बरीच लहान मुले, तरुण पिण्यास सुरुवात करतात आणि त्याचे व्यसन कधी लागते हे कळत नाही. त्याचे भयंकर परिणाम याबद्दल विचार केला जात नाही. महसूल भरपूर मिळतो म्हणून सरकारही दारूचे परवाने देणे थांबवत नाही. दारू संसार उद्ध्वस्त करते, अनेक लोकांचा बळी घेते आणि गुन्हेगारी वाढवते. इतर जुनाट आजारांप्रमाणेच, व्यसनावरही यशस्वीपणे उपचार आणि व्यवस्थापन केले जाऊ शकते. अनेक सामाजिक संस्था त्यासाठी राबत आहेत. सरकारची दारू दुकानाला परवानगी आणि दारूमुळे वाढलेल्या गुन्हेगारीची दखल दोन्ही हास्यास्पद वाटते. आज मी अशा व्यक्तीबद्दल लिहिणार आहे ज्यांनी दारूमुक्ती आणि नशामुक्ती कार्यासाठी स्वतला झोकून दिले आहे. तुषार नातू आणि सहकारी तळमळीने देश दारूमुक्त व्हावा आणि दारूडय़ांचे संसार सुखी व्हावेत याकरता झटत आहेत.

सर सांगतात, “माझी व्यसनाची सुरुवात अगदी तरुण वयापासून झाली. म्हणजे 12 वीमधे असतानाच. आधी कुतूहल म्हणून, मग मित्रांचा आग्रह म्हणून आणि मग सवय म्हणून तंबाखू सिगारेट व बीयर, दारू, गांजा, अफू व ब्राऊन शुगर असा हा प्रवास होता. तरुण वय, उसळते रक्त, काहीतरी वेगळे करण्याची खुमखुमी या सगळ्या गोष्टी व्यसनाधीन होण्यास पूरक असतात. मी स्वतच्याच कैफात जगलो आणि स्वतच्या आयुष्याचे वाटोळे केले. मी कसाबसा रडतखडत पदवीधर झालो. मात्र करिअर म्हणजे काय ते समजलेच नाही कधी…वाटायचे आपण पाहिजे तेव्हा व्यसन सोडू शकतो, पण नंतर कळाले की मी व्यसनांचा गुलाम झालो होतो. भांडणे, तमाशे करणे हे नित्याचेच होऊन बसले. जेव्हा व्यसन सोडवण्यासाठी थोडा प्रयत्न केला तेव्हा प्रचंड शारीरिक त्रास झाला. उलटय़ा, जुलाब, अंगदुखी, झोप न लागणे असे त्रास व्हायचे अन् पुन्हा व्यसन सुरू व्हायचे…खाजगी दवाखाना ते मेंटल हॉस्पिटलात आणि पुढे अनेकदा व्यसनमुक्ती केंद्र, घरातून हाकलून दिल्याने काही दिवस मुंबईला फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर मुक्काम, किरकोळ चोऱ्या, हॉटेलात भांडी धुणे, पाठीवर गोणी घेऊन रस्त्यावर कागद वेचणे असे सर्व प्रकार करून झाले. वयाच्या 17 व्या वर्षी सुरू झालेला व्यसनाचा प्रवास पूर्ण थांबेपर्यंत वयाची चाळिशी आली होती. व्यसनाच्या गुलामीतून बाहेर पडणे कठीण असते. पण मला माझी चूक समजली दारूने जीवनाचा सत्यानाश केला हे लक्षात आले. आणि पक्का निश्चय करून दारू सोडायची ठरवले. वयाच्या चाळिशीत भानावर आलो आणि मग व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कायमचे राहायचे ठरवले. मित्राच्या नव्यानेच सुरू झालेल्या नागपूर येथील व्यसनमुक्ती केंद्रात कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो. पाहता पाहता याच क्षेत्रातच स्थिरावलो. लहानपणापासून असलेली सामाजिक कार्याची ओढ,  प्रचंड वाचन, चांगले वत्तृत्व, साहित्य, कला, संगीत, लेखन यात रुची अशा प्रकारचे व्यक्तिमत्व व पूर्ण झोकून देऊन काम करण्याचा स्वभाव व्यसनमुक्तीचे कार्य करताना पथ्यावर पडला. व्यसनाधिनता हा व्यक्तिमत्त्वाला झालेला एकप्रकारचा गुंतागुंतीचा मनोशारीरिक आजार कसा आहे याचा सखोल आभ्यास स्वतच्या अनुभवातून पक्का झाला होता. तोच अनुभव या कार्यात मदतीस आला. हल्ली तर परिस्थिती अतिशय गंभीर होते आहे. व्यसनाधिनतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे…अगदी 10/12 वर्षांची मुलेदेखील वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनात अडकत आहेत. तंबाखू, गुटखा, बीअर, दारू आणि सर्व प्रकारचे मादक पदार्थ याबरोबरच झटपट लॉटरी, जुगार, मोबाईलवर गेम खेळणे, मोबाईलवर पत्ते खेळणे व पॉर्न फिल्म पाहणे असे व्यसनांचे नवनवीन प्रकार वाढत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे जगण्यासाठी असणारी स्पर्धा खूप वाढलीय, दारू व इतर अमली पदार्थांची सहज उपलब्धी अशा अनेक प्रकारच्या कारणांनी व्यसनाधीनतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.”

व्यसनाधीनतेच्या गुलामीत अडकणे अतिशय सोपे आहे, परंतु त्यातून बाहेर पडून पुन्हा नव्याने व्यसनमुक्त जीवनाची स्रुवात करून कायमचे व्यसनमुक्त राहणे प्रचंड अवघड आहे. नागपूरच्या ‘मैत्रयी’ व्यसनमुक्ती केंद्रामार्फत व्यसन मुक्तीचे कार्य तीन पातळ्यांवर चालते. जनजागृती, उपचार आणि पुनर्वसन. व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम पोचवून लोकांना व्यसन करण्यापासून दूर ठेवणे हा जनजागृतीचा भाग आहे. ज्यात महाविद्यालये, सामाजिक संस्था व विविध सांस्कृतिक कार्पामांमधे व्याख्याने देणे, पथनाटय़े करणे, शोभायात्रा काढणे, निबंध स्पर्धा आयोजित करणे, वर्तमानपत्रे नियतकालिके यात लेख लिहिणे हे कार्य नियमित केले जाते. तसेच व्यसनाधीनतेबद्दल समजात जागृती व्हावी, या उद्देशाने सरांनी या विषयावर 3 पुस्तके लिहिली आहेत. नशायात्रा – व्यसनाधिनतेच्या प्रवासाचे आत्मकथन आहे, बंडखोर – हे पुस्तक व्यसनाधिनता या मनोशारीरिक आजाराची व उपचारांची सविस्तर माहिती देणारे पुस्तक असून यात नागपूरच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेऊन व्यसनमुक्त झालेल्या लोकांच्या सक्सेस स्टोरीज व खूप प्रयत्न करूनही न सुधारू शकलेल्या लोकांच्या सत्य कथा आहेत. ‘बेवडय़ाची डायरी’ या पुस्तकात केंद्रातले वातावरण, तेथील उपचार पद्धती, गमतीजमती व गंभीर प्रसंग असे सगळेच आहे.

आजवर या कार्याचा भाग म्हणून सुमारे 5 लाख लोकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोचवला आहे. एकंदर 10 हजार लोकांना व्यसनमुक्तीचे यशस्वी उपचार दिले आहेत. आता व्यसनमुक्तीचे कार्य हेच त्यांचे ध्येय असून फेसबुक व्हाटस्अप व यूटय़ुब

चॅनेलद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोचवण्याच्या आणि व्यसनी लोकांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्री. रवी पाध्ये नागपूरच्या या संस्थेचे डायरेक्टर असून तुषार नातू आणि संपूर्ण टीम व्यसनमुक्तीसाठी समर्पित आहे. 9850345785 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही गावात व्यसनमुक्तीसाठी कार्पाम ठरवू शकता किंवा व्यसनी व्यक्तीला या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवू शकता किंवा मार्गदर्शन मिळवू शकता. जर तुम्हाला मनापासून वाटते दारू सुटावी आणि परिवार आनंदी व्हावा तर नागपूरच्या ‘मैत्रयी’ व्यसनमुक्ती केंद्रास भेट द्या आणि स्वतच्या व्यसनापेक्षा परिवाराची किती काळजी आहे हे दाखवून द्या.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची-केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)