संचित : मनस्वी कलाकार

>>दिलीप जोशी

व्यंगचित्रांबरोबरच, उत्तम अक्षरलेखन, अर्कचित्र आणि ‘इलस्ट्रेशन’च्या सर्व चित्रकला प्रांतात स्वतचा ठसा उमटविणारे विकास सबनीस. ग्रंथालीच्या ग्रंथमोहोळ या वाचक चळवळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली ओळख पुढे घट्ट मैत्रीत रुपांतरीत झाली. मैत्रीतील ते क्षण, त्या आठवणी व्हिडीओ मुलाखतीच्या रूपात संग्रही आहेत.

विकास सबनीस 1975 मध्ये आमच्या ‘श्री’ साप्ताहिकासाठी फ्रीलान्स काम करू लागला. त्या वेळचे अनेक तरुण समन्वयस्क मित्र पुढे त्यांच्या क्षेत्रात खूप नावाजले. विकास त्यापैकीच. चित्रकला आणि व्यंगचित्र कलेबरोबरच तो उत्तम ‘लेटरिंग’ करायचा. विषयानुरूप अक्षरलेखनाची शैली ‘कव्हर’ आकर्षित करायची. तो अर्कचित्रंही अप्रतिम चितारत असे. त्या काळात इडी अमीन या आफ्रिकेतील हुकूमशहाचं अर्कचित्र त्याने इतकं छान काढलं होतं की वाचकपत्रांमध्ये त्याची मोठय़ा प्रमाणावर दखल घेतली गेली होती.

त्या वेळपासूनच विकासच्या घराशीच नातं जुळलं. त्याच्या दादरच्या घरात तो एकाग्रतेने व्यंगचित्र साकारताना अनेकदा पाहिलंय. 1980 च्या दशकात आमचा एक मोठा दौरा झाला. ‘ग्रंथमोहोळ’ ही ग्रंथाली वाचक चळवळीने आयोजित केलेली ग्रंथयात्रा होती. विविध जिल्हय़ांमध्ये पुस्तकं आणि साहित्यिक कार्यक्रम असं त्याचं स्वरूप होतं. माझ्यावर विकासच्या मुलाखतीची जबाबदारी होती. आमच्या बसमध्ये दया पवार, परेन जांभळे, अरुण म्हात्रे वगैरे मंडळी असल्याने प्रवास मजेत झाला. दोन दिवसांत तीन कार्यक्रम करायचे होते. पहिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजकांनी परिचय करून दिल्यावर प्रेक्षकांनी टाळय़ांचा कडकडाट केला. तोच धागा पकडत म्हटलं, ‘तुम्ही असेच टाळय़ा वाजवून आमची झोप उडवत रहा, म्हणजे आम्ही अनेकांची खिल्ली उडवू.’ यावर पुन्हा टाळय़ा आणि तेवढय़ा वेळात चित्र काढण्यासाठीच्या कानव्हासवर विकासने पेंगुळलेला निवेदक साकारला. वातावरण सैलावलं. अनेक राजकीय नेत्यांची व्यंगचित्रं काढून विकासने प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळवली. कार्यक्रम संपता संपता म्हटलं, ‘आता माझं व्यंगचित्र काढा.’ त्यावर माझ्याकडे निरखून पाहात विकास म्हणाला, ‘तुमचा नुसता फोटो काढला तरी पुरेसा आहे!’ श्रोते खळखळून हसले. आमचं असं स्वत:चीच फिरकी घेणारं संभाषण आधीच ठरलं होतं आणि उत्स्फूर्त वाटेल असं सादर करायचं होतं. ते इतकं झकास जमलं की ज्येष्ठ कवी दया पवार खुश झाले. ही मोठीच पावती होती. नंतर विकासने अनेक हौशी प्रेक्षकांची व्यंगचित्रं तिथल्या तेथे काढून दिली. तो त्यांच्यासाठी अमूल्य ठेवा ठरला असेल. माझं ते एकमेव व्यंगचित्र कार्यक्रमाच्या गडबडीत कुठेतरी गहाळ झालं. विकासची व्हिडीओ मुलाखत मात्र संग्रही आहे.

विकासने व्यंगचित्रकला हे जीवनध्येय अगदी नवतरुण असतानाच ठरवलं. त्याचं ‘मार्मिक’साठी काढलेलं पहिलं व्यंगचित्र त्याने प्रबोधनकार ठाकरे यांना दाखवलं आणि त्यांनीच त्याला बाळासाहेबांकडे पाठवलं. केवळ व्यंगचित्र हाच व्यवसाय करून यशस्वी ठरलेले विकाससारखे मुक्त-व्यंगचित्रकार क्वचितच असतील. सुरुवातीला ‘जे. जे. स्कूल आाफ आर्टस्’मध्ये त्याला व्यंगचित्रकलेऐवजी ‘अक्षरलेखन’ कर असा सल्ला मिळाला आणि त्यातही तो पहिला आला. विकासच्या दैनिकातील व्यंगचित्रकारीचा आरंभ झाला तो ‘गोमांतक’मधून. माधव गडकरी त्यावेळी तिथे संपादक होते. पुढे सकाळ, लोकसत्ता अशा अनेक वृत्तपत्रांसाठी त्याने व्यंगचित्रं काढली. विकासच्या व्यंगचित्राचं जागतिक पातळीवरही कौतुक झालं. अमेरिकेतील ‘आटलास वर्ल्ड प्रेस रिव्हय़ू’ या अंकात विकासचं तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांच्यावरचं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं.

विकासच्या व्यंगचित्रांच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘ग्रंथमोहोळ’मधल्या आमच्या कार्यक्रमाने झाली होती. कालांतराने विकासने स्वतंत्रपणे ‘गोष्टी व्यंगचित्रकारांच्या’ असा खुमासदार व्यंगरेषांचा कार्यक्रम सुरू केला. त्याचे कार्यक्रम नेदरलाण्डपर्यंत पोहोचले. बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण, ‘न्यूज वीक’ या अमेरिकन साप्ताहिकाचे व्यंगचित्रकार रेनन ल्युरी यांना विकास आदर्श मानायचा. ल्युरी यांनी हिंदुस्थानात आल्यावर ज्या व्यंगचित्रकारांचा उल्लेख केला त्यात विकासचं नाव होतं.

व्यंगचित्रांबरोबरच, उत्तम अक्षरलेखन, अर्कचित्र आणि ‘इलस्ट्रेशन’च्या सर्व चित्रकला प्रांतात विकासला सारखीच गती होती. ‘श्री’ची अनेक मुखपृष्ठे त्याने विविध पद्धतीने सजवली. तेव्हापासूनच विकास, मी आणि पाडेकर घट्ट मित्र झालो. 2019 च्या नोव्हेंबरमध्ये अशीच बैठक जमली. शिरीष कणेकर त्यांच्या शैलीत अनेक किस्से रंगवत होते आणि आम्ही सारे दाद देत होतो. त्या दिवशी भारतीने आम्हा चार मित्रांचा फोटो काढला. त्यानंतर थोडय़ाच दिवसांत विकास अचानकपणे गेला. त्याचं जाणं सर्वांनाच चटका लावणारं ठरलं. 12 जुलैला विकासचा जन्मदिन होता. एरवी एकमेकांच्या वाढदिवसाला आम्ही परस्परांना फोन करायचो… आता फक्त स्मृती उरल्या!
[email protected]