कोहलीचा टी-20 वर्ल्डकपमधून पत्ता कट करण्यासाठी फिल्डिंग

यंदाच्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचा थरार 2 ते 29 जूनदरम्यान वेस्ट इंडीज आणि यूएसएमध्ये रंगणार आहे. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सर्वच संघांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. मात्र, टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीचा टी-20 वर्ल्ड कपमधून पत्ता कट करण्यासाठी ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांच्याकडून फिल्डिंग लावली जात असल्याचा खळबळजनक आरोप 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू  कीर्ती आझाद यांनी केला आहे.

कीर्ती आझाद यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटले की, ‘जय शहा संघ निवडकर्ते नाहीत. विराट कोहलीला टी-20 संघात स्थान मिळणार नाही हे इतर निवडकर्त्यांशी बोलून त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी अजित आगरकर यांच्यावर का दिली? त्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र विराटला टी-20 वर्ल्ड कपमध्ये का खेळवायचे नाही हे अजित आगरकर ना स्वतःला पटवून देऊ शकले, ना इतर निवडकर्त्यांना, अशी सूत्रांची माहिती आहे.’ जय शहाने रोहित शर्मालाही विचारले, पण रोहित म्हणाला की, ‘आम्हाला कोणत्याही किमतीत विराट कोहली हवा आहे.’ विराट कोहली टी-20 वर्ल्ड कप खेळणार असून, संघ निवडीपूर्वी त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

विराट कोहलीने या वर्षी अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने जवळपास 14 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 2023 हे वर्ष कोहलीसाठी चांगले गेले होते. 2023 च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यामुळे विराट कोहलीला सध्याचा फिटनेस व खेळ बघता त्याला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर बसविणे जय शहासाठी नक्कीच सोपे नसेल.