दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडून विराट कोहली मायदेशी परतला, नक्की कारण काय?

हिंदुस्थानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही उभय संघामध्ये नुकतीच टी-20 आणि वन डे मालिका खेळली केली. टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली, तर वन डे मालिका हिंदुस्थानने 2-1 अशा फरकाने जिंकली. या दोन्ही मालिकेमध्ये हिंदुस्थानचे ताज्या दमाचे खेळाडू मैदानात उतरले होते. आता हिंदुस्थान आणि आफ्रिकेत 26 डिसेंबर पासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. मात्र ही मालिका सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे.

हिंदुस्थानचा सलामीवीर खेळाडू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे दोन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. तर दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) देखील हा दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतला आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.


विराट कोहली याला टी-20 आणि वन डे मालिकेत आराम देण्यात आला होता. त्यानंतर नुकताच तो आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. मात्र आता तो हा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे. कौटुंबिक कारणामुळे त्याला तडकाफडकी मायदेशी परतावे लागले आहे.

विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्यामुळे प्रिटोरिया येथे होणाऱ्या तीन दिवसीय इंट्रा-स्क्वॉड गेममध्ये तो सहभागी होणार नाही. मात्र 26 डिसेंबर पासून जोहान्सबर्ग येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी मालिकेत तो खेळताना दिसेल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

गायकवाडला दुखापत

दरम्यान, 26 वर्षीय खेळाडू ऋतुराज गायकवाड हा दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकणार आहे. 19 डिसेंबर रोजी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वन डे लढतीवेळी त्याला दुखापत झाली होती. यातून तो अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे त्याला कसोटी संघातून रिलीज करण्यात आले असून शनिवारी तो मायदेशी परतेल.