खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे हिंदुस्थानचा हात! जस्टीन ट्रूडोंच्या आरोपांचे परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडण

कॅनडाने हिंदुस्थानवर गंभीर आरोप केला आहे. कॅनडात लपलेल्या दहशतवादी हरदीप निज्जर याची हत्या करण्यामागे हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टी ट्रूडो यांनी केला आहे. निज्जर याच्या हत्येची चौकशी करण्यात येत असून त्याच्या हत्येमागे हिंदुस्थानचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आरोपांचं खंडण केले असून हे सगळे प्रकार कॅनडातील वाढता खलिस्तानी दहशतवाद आणि उग्रवाद्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

निज्जरच्या हत्येमागे हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप करत कॅनडाने तिथल्या हिंदुस्थानच्या एका राजदूताला मायदेशी परत पाठवलं आहे. यानंतर ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत भाषण करताना म्हटले की, क२नडाच्या तपास यंत्रणा निज्जरच्या हत्येमागे हिंदुस्थानी सरकारचा हात असल्याच्या आरोपांचा गांभीर्याने तपास करत आहे. कॅनडाच्या धरतीवर तिथल्या नागरिकाच्या हत्येमध्ये बाहेरील देशाचा हात असेल तर आम्ही कधीही सहन करणार नाही असे ट्रूडो यांनी म्हटले आहे.

ट्रूडो यांनी संसदेत केलेले निवेदन खालीलप्रमाणे आहे

“आज मला एका अत्यंत गंभीर विषयाची सभागृहाला जाणीव करून द्यायची आहे. मी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही याबाबत सांगितले असून सर्वसामान्य जनतेलाही मला हे सांगायचे आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून, कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा कॅनडाचा नागरिक हरदीप सिंग निज्जरची हत्या आणि त्यात हिंदुस्थानच्या सरकारचा असलेला संभाव्य हात याची चौकशी करत आहे. कॅनडा हा कायद्याचे पालन करणारा देश आहे. आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करणे हे आमचे मूलभूत कर्तव्य आहे.

कॅनडातील सगळ्या रहिवाशांची सुरक्षितता याला आमचे प्राधान्य असून या हत्येतील दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. कॅनडाने हा मुद्दा भारत सरकारचे उच्च अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. गेल्या आठवड्यात, मी वैयक्तिकरित्या हा मुद्दा थेट पंतप्रधान मोदींसोबत G20 मध्ये मांडला होता. कॅनडातील भूमीवर कोणत्याही कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत परदेशी सरकारचा सहभाग म्हणजे आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे.”

हिंदुस्थानचे कडक शब्दात उत्तर

हिंदुस्थाननेही ट्रूडो यांच्या आरोपाला कडक शब्दात उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, जे आरोप कॅनडाकडून करण्यात आलेले आहेत ते बिनबुडाचे आणि प्रेरीत आहे. आम्ही कायद्याचे राज्य मानणारे असून कॅनडाने आपल्या घरात काय चालले आहे ते पाहावे. कॅनडामध्ये खलिस्तानी आणि उग्रवाद्यांचे प्राबल्य वाढत आहे. यामुळे हिंदुस्थानच्या एकसंधतेला बाधा निर्माण होण्याची भीती आहे. सदर प्रकरणावर कॅनडा सरकारचे दीर्घकाळापासून असलेले निष्क्रीय धोरण हे आमच्यासाठी चिंतेची बाब आहे.

कोण आहे हरदीप सिंग निज्जर ?
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची 18 जून 2023 रोजी कॅनडात हत्या करण्यात आली होती. कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. निज्जर हा कुख्यात दहशतवादी असून त्याला हिंदुस्थानने वॉण्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आलं होतं. मूळचा पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील रहिवासी असलेला निज्जर अनेक वर्षांपासून कॅनडात राहत होता आणि तिथून दहशतवादाला खतपाणी घालत होता. शिख फॉर जस्टिस या संघटनेशी तो निगडीत होता असेही सांगण्यात येते. लॉरेन्स बिश्नोई टोळीला निज्जरने पाठबळ दिलं होतं. तो या टोळीच्या गुंडाना हरतऱ्हेची मदत करत होता. 2022 मध्ये पंजाबमधील जालंधर इथे एका हिंदू पुजाऱ्याची हत्या करण्यात आली होती, या हत्येमागे निज्जरचा हात असल्याचा संशय आहे. हिंदुस्थानातील अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये निज्जरचा हात असल्याचा आरोप असून त्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. हिंदुस्थानमधील तपास यंत्रणा निज्जरच्या कॅनडातील हालचालींवर नजर ठेवून होती.