महिलांचे सेक्स्टॉर्शन करणाऱया प्लंबरला बेडय़ा; देवनार पोलिसांची कारवाई

ज्या मोबाईल क्रमांकावरील व्हॉट्सअॅपच्या डीपीवर महिलेचा फोटो असेल अशा नंबर मेसेज पाठवायचे. जर कोणी रिप्लाय केला की त्या महिलेला न चुकता मेसेज पाठवायचे. तिच्याशी ओळख वाढवायची आणि तिला गोडीगुलाबीने आपल्या जाळय़ात ओढायचे. मग तिचे सेक्स्टॉर्शन करणाऱया यूपीतल्या एका प्लंबरच्या देवनार पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

‘एक नंबर मिस्टेक हो गया था, इसलिए आपके पास मेसेज चला गया. मै यूपीका रहेना वाला हू, फिलहाल मुंबई मै रहेता हू. नाईस डीपी ब्युटिफुल…’ ज्या डीपीवर महिलेचा पह्टो असेल त्या नंबरवर असा मेसेज तो पाठवायचा. देवनार येथील एका महिलेने त्याला रिप्लाय दिला आणि ती त्याच्या जाळय़ात फसत गेली. तो तिला नियमित मेसेज करू लागला. बोलणं अगदी खासगी होऊ लागले. याचा गैरफायदा घेत त्याने महिलेचे आक्षेपार्ह फोटो पाठविण्यास सांगितले. महिलेनेही मोठय़ा विश्वासाने तसे फोटो त्याला पाठवले. मग व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करून महिलेचे बोलतानाचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले व ते व्हिडीओ तिला व तिच्या पतीस पाठवून 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास सदर फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या महिलेने देवनार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक शशांक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीराम घोडके तसेच अनिकेत कदम, राहुल पाटील, शिल्पा जोरे व सुवर्णा या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा महिलेचे सेक्स्टॉर्शन करणारा राजस्थानात असून अस्लम मोहम्मद इस्लाम खान अन्सारी (25) असे नाव असल्याचे समजताच त्याला पकडून आणले.

मेसेज पाठवायचे मग जाळय़ात ओढायचे
अस्लम हा प्लंबरचे काम करतो. सकाळी कामाला जाण्याआधी तो शक्य तितक्या महिलांना मेसेज करण्याचा प्रयत्न करतो. नंबरमध्ये गडबड झाल्याने तुम्हाला मेसेज गेला असा मेसेज तो करतो. संध्याकाळी कामावरून आल्यानंतर कोणी रिप्लाय दिला का बघतो. एखाद्या महिलेने जरी रिप्लाय दिला की तो दररोज सकाळ-संध्याकाळ मेसेज करण्यास सुरुवात करतो. अशिक्षित असला तरी तो महिलांना बोलत करतो मग संधी साधत त्यांचे अश्लील फोटो अथवा व्हिडीओ बनवतो. त्यानंतर सेक्स्टॉर्शन करतो, अशी त्याची मोड्स ऑपरेंडी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.