परीक्षण – आग्रा ते राजगड प्रवासाचा थरारपट

>>अनिकेत मोहिते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान जीवनकाळात आग्र्याची भेट आणि तेथून स्वराज्यात परतण्याचा प्रवास यांचे एक वेगळे महत्त्व आहे. याविषयीची उपलब्ध माहिती वाचली तरी महाराज नेमके कसे आणि किती दिवसांत स्वराज्यात परतले, हा प्रश्न मनाला पोखरत राहतो. पावसाळा, त्यात उत्तरेकडील नद्यांची पूर परिस्थिती, सोबतीला मोजके शिलेदार, शंभूराजांची काळजी, अनोळखी प्रदेश, मोगलांच्या सैन्याची कधीही धाड पडेल याची भीती, स्वराज्याची लागलेली ओढ, भविष्यात मुघल-मराठा संबंधांची आखलेली रणनीती, ओळख लपवून दररोज पार करायच्या अंतराची काळजी, एवढे सगळे विचार डोक्यात घेऊन महाराजांनी हे सर्व कसे पार केले असेल यावर आजवर कधीच समाधानकारक वाचायला मिळाले नव्हते, ते नितीन थोरात यांच्या ‘साधू’ कादंबरीने करून दाखवले आहे.

सेतू माधवराव पगडी यांच्या ‘छत्रपती नि त्यांची प्रभावळ’ या पुस्तकात महाराजांच्या आग्रा भेटीचा आणि स्वराज्यात परतण्याचा प्रवास थोडाफार मांडण्यात आला आहे. अनेक संदर्भ देऊन त्यांनी महाराज कोणत्या मार्गाने परत राजगडी पोहोचले हे अधोरेखित केले आहे. पण सगळे संदर्भ वेगवेगळे मार्ग आणि वेगवेगळा काळ सुचवतात. कुठे म्हटले आहे की, महाराज पंधरा दिवसांत राजगडी पोहोचले; तर कुठला संदर्भ हेच दिवस चाळीस होते म्हणून सांगतो. काही संदर्भ सांगतात की, 12 सप्टेंबर 1666 ला महाराज परतले, तर काही सांगतात, 20 नोव्हेंबर 1666 ला महाराज स्वराज्यात परतले. ज्याप्रमाणे दिवसांवर ठामपणा नाही, अगदी तसेच महाराजांनी प्रवास केलेल्या मार्गाचाही काही ठळक पुरावा किंवा उल्लेख वाचण्यात येत नाही. अनेक इतिहास तज्ञ हे आग्रा ते राजगड हे सरळ आणि वाकडय़ा मार्गाने अंतर किती लांब आहे आणि त्यानुसार किती दिवसांनी राजांनी हा प्रवास पूर्ण केला असेल यावर भाष्य करतात. तर अनेक ठिकाणी महाराजांच्या मार्गांची वेगवेगळी वर्णने वाचायला मिळतात. काही ठिकाणी महाराज हे बनारस, गया, जगन्नाथ पुरी या ठिकाणी दर्शन करून माघारी आल्याचा उल्लेख आहे. तर काही ठिकाणी महाराज मथुरा-काशी-अलिगढ-फतेहगड-अलाहाबाद-रायपूर-गोदावरीमार्गे विजापूर-भीमा ओलांडून राजगड असा प्रचंड 1550 मैल प्रवास करून परतले असे वर्णन आहे.

.17 ऑगस्ट 1666 हा दिवस एवढा महत्त्वाचा का आहे, हे कादंबरी वाचताना समजून येते. शिवाजी महाराज आग्रयात कैद असताना मुघलांच्या पाच हजार सैनिकांच्या पहाऱयातून निसटले आणि एकच गहजब झाला. तोच गजहब ध्यानी ठेवून राजांनी आखलेली व्यूहरचना कशी पार पडते, कोणती संकटे येतात, त्यांना कसे तोंड दिले जाते हे सारे वाचणे अंगावर शहारे आणणारे आहे.

‘साधू’ वाचताना महाराजांच्या सुटकेच्या अगदी सुरुवातीपासून सुरू झालेल्या प्रवासाचे आपण साक्षीदार होतो. 48 दिवस नजरकैदेत राहून परतीचा टप्पा सुरू करणारे निराजी, राघोजी, माणकोजी, कोतोबा, दत्तोजी यांच्या सोबत आपलाही प्रवास सुरू होतो. मथुरेत असलेल्या काशीपंतांची घेतलेली मदत, मुद्दाम मुघलांची दिशाभूल करण्यासाठी अनेक आघाडय़ांवर पेरलेले नकली शिवाजी महाराज, मुघलांना गुंगारा देण्यासाठी मुद्दाम निवडलेला लांबचा मार्ग, एवढय़ा मोठय़ा पल्ल्याच्या प्रवासात अनेकदा जिवावर बेतणारे प्रसंग आणि त्यातून बुद्धीच्या बळावर महाराजांनी काढलेले पर्याय, शंभूराजांना दूर ठेवून प्रवास करणारा भावनिक पिता, प्रत्येक क्षणी पुत्राच्या आठवणीने हळवा, प्रसंगी कठोर होणारा बाप यांसारख्या महाराजांच्या अनेक छटा अनुभवता येतात. स्वराज्यात पोहोचेपर्यंत प्रत्येक क्षणी बदलत जाणारी परिस्थिती आणि प्रत्येक वेळी महाराजांना बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेर विभागाने दिलेली साथ हे वाचताना आणि अनुभवताना पुस्तक अजिबात खाली ठेवायची इच्छा होत नाही.

 साधू  लेखक ः नितीन थोरात
 प्रकाशक ः रायटर पब्लिकेशन