जुन्या हस्तलिखितांमधून उलगडणार प्राचीन इतिहास व सांस्कृतिक वारसा, सांस्कृतिक विभागाची ‘हर घर दस्तक’ मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ai image

कोकणासह राज्याच्या विविध भागांमध्ये विशेषतः ग्रामीण भागांमध्ये घराघरांमध्ये जुनी हस्तलिखिते पिढ्यानपिढ्या जपून ठेवली गेली आहेत. या हस्तलिखितांमध्ये इतिहास लपलेला आहे. त्याची डिजिटल नोंद करून तो जगासमोर आणण्यासाठी सांस्कृतिक  विभागाकडून ‘हर घर दस्तक’ ही मोहीम हाती घेतली जाणार आहे.

हस्तलिखित दस्तऐवजांच्या स्वरूपात असलेला  ऐतिहासिक आणि सांस्कृतिक  वारसा जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने डिजिटल नोंदणीचा उपक्रम सुरू केला आहे. या नोंदणीसाठी ‘हर घर दस्तक’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या हस्तलिखित दस्तऐवजांच्या ऑनलाईन नोंदीतून सांस्कृतिक  वारसा जगासमोर आणावा, असे निर्देश सांस्कृतिक  कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी दिले आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देशभरातील हस्तलिखित दस्तऐवजांचे जतन आणि डिजिटलायझेशन करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी ‘ज्ञानभारती’ अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून राज्यातील हस्तलिखित दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहेत. यामुळे देशाचा प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक  वारसा जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

हस्तलिखितांची मूळ मालकी संबंधितांचीच राहणार

स्थानिक पातळीवर हस्तलिखित दस्तऐवज उपलब्ध असलेल्या विविध संस्था, ऐतिहासिक घराणी, नागरिक, संघटना आणि पुटुंबे यांची जिल्हा व तालुकास्तरीय सविस्तर यादी तयार करावी. यादी तयार झाल्यानंतर संबंधितांशी संपर्प साधून त्यांच्याकडील दस्तऐवजांची माहिती घेत ‘ज्ञानभारती’ अॅपवर त्यांची नोंदणी करावी. या नोंदणी प्रक्रियेत दस्तऐवजांची मूळ मालकी संबंधित संस्था, घराणी किंवा नागरिकांकडेच कायम राहील. केवळ दस्तऐवजांचे जतन करणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे, असेही आशीष शेलार यांनी स्पष्ट केले.