मराठमोळ्या मल्लांनी ऑलिम्पिक पदके जिंकावीत

‘आजवर महाराष्ट्राने अनेक मल्ल घडवले; पण आपल्याला आशियाई स्पर्धांपुरते थांबून चालणार नाही. आता मॅटवरील कुस्तीच्या सरावाला अधिक प्राधान्य द्यायला हवे. आगामी काळात ऑलिम्पिकसारख्या क्रीडाविश्वातील सर्वोच्च स्पर्धेत मराठमोळय़ा कुस्तीगीरांनी पदके जिंकायला हवीत’, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

आंबेगाव, पुणे येथील राष्ट्रीय कुस्तीपटू, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी ‘सन्मान कुस्तीचा, कृतज्ञता सोहळा पैलवानांचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अर्जुन पुरस्कारप्राप्त, राष्ट्रकुल व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी यांच्यासह वस्ताद, पंच व कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांचा यावेळी पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यातील कुस्तीपटूंनी एकत्र येत या अनोख्या सोहळय़ाचे आयोजन केले होते, हे विशेष.

आपल्या अध्यक्षीय भाषणात पवार म्हणाले, ‘सामान्य घरातील मुलांनी ज्या खेळांना प्रतिष्ठा मिळवून दिली त्यात कुस्तीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर ही एकेकाळी कुस्तीची पंढरी झाली. पुढच्या काळात हा प्रभाव कोल्हापूर, सांगलीपुरता मर्यादित न राहता पुणे व अन्य शहरांतही कुस्तीचा प्रचार प्रसार झाला. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मामासाहेब मोहोळ यांनी आत्मीयतेने प्रयत्न केले म्हणूनच नवे मल्ल घडू शकले. 1983 पासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची जबाबदारी मी घ्यावी, अशी सूचना मोहोळ यांनी केल्यावर मलाही या खेळासाठी योगदान देण्याची संधी लाभल्याचे पवार म्हणाले.

मॅटवरच्या कुस्तीला प्राधान्य द्या!

येणाऱया काळात मातीतील कुस्ती कमी होईल. कारण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्ती खेळली जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची पताका फडकाविण्यासाठी मॅटवरील कुस्तीला प्राधान्य द्यावे लागेल, असे मार्गदर्शनही शरद पवार यांनी केलं.

कुस्तीगिरांनी केला पवारांचा विशेष सत्कार

गेल्या पाच-सहा दशकांच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत कुस्तीसाठी आणि कुस्तीगिरांसाठी शरद पवारांनी वेळोवेळी घेतलेली ठाम भूमिका सर्वज्ञात आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या आर्थिक स्थितीचे वास्तव समजताच महाराष्ट्र केसरींसाठी पेन्शन योजना सुरू करणारे नेते अशी पवारांची मुख्य ओळख आहे. पैलवानांच्या अडचणीच्या काळात ते पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मराठी पैलवानांसाठी त्यांनी स्वतः लक्ष घातले.