दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘तो’ एक गुण मिळणार, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा’, या दहावीच्या विज्ञान 1 च्या पेपरमधील प्रश्नाच्या उत्तराबाबत निर्माण झालेला संभ्रम राज्य शिक्षण मंडळाने दूर केला आहे. विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर हायड्रोजन किंवा हेलियम लिहिले असल्यास दोन्ही उत्तरांना गुण मिळणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबतच्या सूचना संबंधित विषयाच्या नियामक आणि परीक्षकांना दिल्या आहेत.

‘विज्ञान भाग – एक’ या विषयाच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 1 (B) मधील i क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा’ या प्रश्नाची दोन उत्तरे समोर आली होती. पाठय़पुस्तकानुसार प्रश्नाचे अचूक उत्तर ‘हेलियम’ हे आहे, तर काही संदर्भ पुस्तकांमध्ये याचे उत्तर ‘हायड्रोजन’ असल्याचे दिसून येत आहे. राज्य शिक्षण मंडळाने याविषयी विषय तज्ञांचे अभिप्राय घेतले असून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार  दोन्ही उत्तरे ग्राह्य धरून गुण देण्यात येणार आहेत.