राज्यात बीई, बीटेक, एमटेकच्या 11 हजार 451 नव्या जागा

राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षात बीई, बीटेक, एमटकेच्या जागांमध्ये भर पडली असून तब्बल 11 हजार 451 जागा वाढल्या आहेत. अभियांत्रिकी (बीई) शाखेची पुणे आणि नंदुरबार येथे दोन नवीन महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यासोबतच एमबीएची 4 आणि पीजीडीएमची 2 अशा एकूण 8 नवीन विनाअनुदानित महाविद्यालयांनादेखील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने मंजुरी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परवानगीनंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ही महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यात बीई, बीटेकच्या 254 नवीन तुकडय़ा निर्माण झाल्या आहेत. 

मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने तसेच स्थलांतरित आदी कारणांमुळे बीईच्या 129 तुकडय़ा बंदही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 5 हजार 631 जागा कमीही झाल्या आहेत, तर एमई, एमटेकच्या 92 तुकडय़ा बंद करून नव्याने मागणी करण्यात आलेल्या 27 तुकडय़ांना मंजुरी देण्यात आली आहे. एमई आणि एमटेकच्या जागांमध्ये एकीकडे 325 जागांची वाढ करण्यात आली असून दुसरीकडे मागील काही वर्षांत रिक्त राहत असलेल्या महाविद्यालयातील 1 हजार 316 जागा कमी करण्यात आल्या आहेत. 

डी. फार्मसीची 22 नवी महाविद्यालये 

राज्यात यंदा फार्मसी काwन्सिल ऑफ इंडियाने डी. फार्मसीच्या नवीन 22 पदविका महाविद्यालयांना परवानगी दिली आहे. यामुळे या अभ्यासक्रमासाठी यंदापासूनच 1 हजार 360 जागा वाढणार आहेत. नव्याने सुरू होणाऱया महाविद्यालयांमध्ये नगर, नागपूर प्रत्येकी 3,  बुलढाणा, जळगाव, नाशिक जिह्यात प्रत्येकी 2 आणि उर्वरित कोल्हापूर, धुळे,  वर्धा, चंद्रपूर, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, भंडारा, गडचिरोली आदी जिह्यात प्रत्येकी एक महाविद्यालय आहे. 

बीटेकच्या काही वाढीव जागा 

  • कॉम्प्युटर इंजिनीअरिंग 4128  
  • कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड  इंजिनीअरिंग 3348  
  • इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग 2175
  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 870  
  • इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग 540  
  • मेपॅनिकल इंजिनीअरिंग 354  
  • इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग 378  
  • सिव्हिल इंजिनीअरिंग 234