चिंता वाढली! हिंदुस्थानात कोरोनाने डोके वर काढले, 24 तासांत 148 नवे रुग्ण

कोरोनोने जगातून एक्झिट घेतली असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोके हळूच वर काढले आहे. हिंदुस्थानात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाटय़ाने वाढू लागला आहे. हिंदुस्थानात अवघ्या 24 तासांत 148 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून 808 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाची ही माहिती हिंदुस्थानातील नागरिकांसाठी चिंता वाढवणारी आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे चीनमध्ये एका गूढ आजाराने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

चीनमध्ये न्यूमोनियासदृश नवीन व्हेरिएंट आढळल्याने तेथील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तिथल्या अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना हा न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. एका बाजूला चीनमधील वैज्ञानिक या नव्या न्यूमोनियावर संशोधन करत असताना हिंदुस्थानात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हिंदुस्थानचे आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात लसीकरण झालेले आहे; परंतु लोकांना सावध राहण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयाकडून दिला जात आहे.

थंडीत वाढतेय कोरोना रुग्णसंख्या

हिवाळा सुरू होताच देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. गेल्या तीन वर्षांमध्ये आरोग्य विभागाला असा अनुभव आलेला आहे. गेल्या वर्षीदेखील हिवाळा सुरू होताच अचानक कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले होते. पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाचे या वाढत्या आकडेवारीवर लक्ष आहे. तसेच कोणीही चिंता करू नये, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.