मुंबईत 18 ठिकाणी अत्याधुनिक शौचालये; पालिका 78 कोटी रुपये खर्च करणार

मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वर्दळीच्या ठिकाणी 18 अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली शौचालये उभारण्यात येणार आहेत. मुंबईतील वर्दळीच्या 18 ठिकाणांची निवड करण्यात येणार असून यासाठी तब्बल 78 कोटी खर्च येणार आहे. मुंबई पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही शौचालये बांधण्यात येणार आहेत.

मुंबईची लोकसंख्या सध्या दीड कोटीच्या घरात पोहोचली असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. भविष्यात लोकसंख्येची वाढ लक्षात घेऊन लोकांना देण्यात येणाऱया सार्वजनिक सोयीसुविधांमध्येही वाढ होणार आहे. मुंबईची धार्मिक पर्यटन स्थळे असलेल्या हाजी अलीसारख्या ठिकाणांसह वरळी, शीव, मुलुंड, माहीम, वांद्रे अशा वर्दळीच्या ठिकाणांची निवड करून अत्याधुनिक सुविधा असलेली शौचालये उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

झोपडपट्टीत धुलाई यंत्रे
झोपडपट्टीतल्या रहिवाशांसाठी 16 सुविधा शौचालयांसह स्वयंचलित यंत्राद्वारे माफक दरात कपडे धुण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे 51 कोटींचा खर्च येणार आहे. या सुविधांसाठी लागणारी वीज ही सौरऊर्जेतून निर्माण केली जाणार आहे.