आरोपीकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना मुलुंड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना अटक

bribe

आरोपीला अटकेची भीती दाखवून त्याच्याकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना मुलुंड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. भूषण मुकुंदलाल दायमा (40) पोलीस निरीक्षक (गुन्हे) आणि रमेश मछिंद्र बतकळस (46) पोलीस हवालदार अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

मुलुंड पोलीस ठाण्यात एका 35 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला लाचखोर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात मदत करतो व गुन्ह्याचे स्वरूप कमी करतो असे सांगितले. तसेच अटक पूर्व जामीन रद्द झाल्यानंतर अटकेची भिती दाखवून प्रथम त्या पोलिसांनी आरोपीकडे 25 लाख रुपये लाच मागितली. याची तक्रार त्या व्यक्तीने 7 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बृहन्मंबई यांच्याकडे केली.

ला. प्र. विभागाने त्यानुसार दिनांक 11 व 13 जुलै रोजी सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदार व्यक्तीकडून तडजोडीअंती 11 लाख रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच स्विकारण्याची तयारी दर्शवून ती घेण्याचे मान्य केले. त्यानंतर दिनांक 14 जुलै रोजी ला. प्र. विभागाने सापळा रचला. या कारवाई दरम्यान त्यातील पहिला हफ्ता म्हणून 2 लाख इतक्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यावरून गु. नो. क्र. 25/2023 कलम 7 भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.