अमेरिकेत माथेफिरुचा अंधाधुंद गोळीबार, 22 जणांचा मृत्यू

अमेरिकेमध्ये एका माथेफिरुने अंधाधुंद गोळीबार केला आहे. ही घटना लेविस्टन शहरात घडली असून यामध्ये जवळपास 22 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात 50 हून अधिक नागरीक जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा फरार झाला असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. गोळीबार करणाऱ्यांने एका बोलिंग अॅलीमध्ये आणि तिथून जवळच असललेल्या एका हॉटेलमध्ये गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो जारी केला असून तो दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हल्लेखोराच्या गाडीचाही फोटो पोलिसांनी जारी केला आहे. पोलिसांनी ज्या भागात हा हल्ला झाला आहे त्या भागातील दुकानदार आणि व्यावसायिकांना त्यांची दुकाने आणि कार्यालये काही काळासाठी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

‘मेन’चे खासदार जेरेड गोल्डन यांनी X वर एक पोस्ट लिहिली आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “इतर ‘मेनर्स’प्रमाणे, आज रात्री लेविसनमध्ये घडलेल्या घटनांनी मी देखील घाबरलो आहे, मेन हे माझे मूळ ठिकाण आहे.” जेरेड यांनी म्हटलंय की या भागात अनुचित घटना घडू नये याकडे सगळ्यांचे लक्ष्य असून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. हल्लेखोराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.

युनायटेड स्टेट्समध्ये गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळे तिथली परिस्थिती ही चिंताजनक बनत चालली आहे. अमेरिकेमध्ये तिथल्या नागरिकांपेक्षा तिथल्या लोकांपेक्षा अधिक बंदुका आहेत असं म्हटले जाते. बंदूकसंस्कृतीला आळा घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्याला यश मिळताना दिसत नाहीये. अमेरिकेत या वर्षी 500 हून अधिक गोळीबाराच्या घटनांची नोंद झाली आहे. जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या दहा महिन्यांमध्ये एकुण 487 गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मृत्युमूखी झालेल्यांची संख्या 550 पेक्षा अधिक आहे, तर जवळपास 2000 नागरीक जखमी झाले आहेत.