15 वर्षात तीन हजार कोटी मिळूनही नांदेड शहर बकाल, 82 वस्त्यांमध्ये पाणी शिरले

विजय जोशी

2008 गुरुतागद्दी ते 2023 पर्यंत नांदेड शहर व परिसराला तीन हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त होवून सुध्दा प्रशासन, राज्यकर्ते, कंत्राटदार यांच्या संगनमताने या शहराची वाट लागलेली नांदेडकरांनी पाहिली. एकट्या नांदेड शहरात 182.50 मि.मी.पाऊस झाला. आणि शहरातील 82 महत्वाच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. तर सहाशेहून अधिक लोकांना बोटीने बाहेर काढावे लागले. हे या शहराचे दुर्दैव.

नांदेड शहरात दि. 27 जुलै रोजी तब्बल 14 तास पाऊस झाला. कदाचित गेल्या वीस वर्षातला एका दिवसात पडलेला सर्वात जास्त पाऊस. या पावसाची नोंद 182.50 मि.मी. एवढी झाली. खरे तर श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांच्या कृपेने या शहराला त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने केंद्र व राज्य सरकारकडून गुरुतागद्दी व जेएनयुआरएम या दोन प्रस्तावातून एकोणिसशे कोटी रुपयांचा निधी 2008 व 2009 या वर्षात मिळाला. कामे पूर्ण झाल्यानंतर हा निधी मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग होवून त्यांची बिलेही प्राप्त झाली.

याअंतर्गत शहराच्या आजूबाजूला असलेले वळण रस्ते, सुशोभिकरण, गुरुव्दारा परिसराचा विकास, गोदावरी घाटावरील सुशोभिकरण आदींचा यात समावेश होता. यासोबतच गोरगरिबांना झोपडपट्टी हटविल्यानंतर द्यावयाच्या घरांचाही समावेश होता. विशेषतः 2008 साली देखील नांदेड शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे या अतिवृष्टीचा अहवाल व येणार्‍या काळात त्याबाबत शहराचे करावयाचे नियोजन तसेच उपाययोजना याचाही अहवाल करुन भविष्यातील 25 वर्षाचा आराखडा तयार करण्यात आला. यात अंतर्गत रस्ते, गटारी, जलशुध्दीकरण प्रकल्प, शुध्द पाणीपुरवठा, गोदावरी शुध्दीकरण या कामांचाही समावेश होता. दलित वस्ती सुधार योजना, रमाई आवास योजना, अमृत योजना (एक आणि दोन) यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले.

प्रशासनाकडूनच मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या सर्व योजनावर जून महिनाअखेर 2008 ते जून 2023 पर्यंत तीन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र एकाच पावसाने या नांदेड शहराचे पितळ उघडे पडले ते 182 मि.मी.पावसाच्या तडाख्याने. दरवर्षीचे निर्माण होणारे प्रश्न वसंतनगर, आनंदनगर, बाबानगर, श्रावस्तीनगर, बालाजीनगर, सखोजीनगर, विष्णूनगर, सहयोगनगर, हमालपूरा, इस्लामपूरा, सिडको, हडको, कौठा, वाल्मिकीनगर, मिल्लतनगर, खुराणा ट्रॅव्हल्स ते बाफना टी पाईंट, डॉक्टर लेन, हिंगोली गेट अंडर ब्रिज, वाघी रोड, समीराबाग, तहुराबाग, अबचलनगर, बँक कॉलनी, हमालपूरा, लातूर रोड, लक्ष्मीनगर, गोकुळनगर यासह 89 वस्त्यांमध्ये पाणी शिरले. श्रावस्तीनगरात व परिसरातील दोन नगरात बोटीने लोकांना काढावे लागले.

शहराच्या या अवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते हरिष ठक्कर, हर्षद शहा, दिलीप शिंदे, गुणवंत पाटील हंगरगेकर, डॉ.पी.डी.जोशी आदींनी सामनाशी बोलताना सांगितले की, अगोदर रस्ता की अगोदर नाल्या या वादामध्ये या शहराची वाट लागली. शहराचे रस्ते झाल्यानंतर नाल्या तर कधी पुन्हा त्यावर रस्ते, त्याअगोदर नाल्या, त्याही रस्त्यापेक्षा कधी उंच, कधी रस्त्याच्या खाली त्यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होण्यास नियोजनच नाही. आजही शहरातील नव्या साडेतीनशे कोटी रुपयांच्या गेल्या वर्षीच्या मंजूर झालेल्या निधीतील रस्त्यांची पाहणी करता व अभ्यास करता या ही रस्त्यावरुन पाणी जाण्यासाठी मार्ग नाही.

खरंतर डी मार्ट रोड ते कॅनॉल रोड या रस्त्याच्या दुरुस्तीची व सिमेंटीकरणाची गरज नसताना या रस्त्यावर 50 कोटी रुपये खर्च करुन ऐन पावसाळ्यात रस्ता डांबरावर सिमेंटीकरण होत आहे. हा एक नवाच प्रयोग नांदेड उत्तरमध्ये होत आहे. जनतेच्या या बाबतच्या भावना अत्यंत तीव्र असून, मनपाच्या यापूर्वीच्या ढिसाळ नियोजनामुळे व चुकीच्या कामाच्या पध्दतीने शहराचे वाटोळे झाले. याला त्या काळातील संबंधित अधिकारी देखील जबाबदार आहेत. आज अंडरग्राऊंड असलेल्या अनेक गॅरेज, सर्व्हिसेस, दवाखाने व अन्य मोठ्या इमारतीत गेली दोन दिवस झाले पाण्याचा उपसा करावा लागत आहे. तेथील व्यवसाय बंद आहे.

एकंदरच ज्या शहराला पंधरा वर्षात तीन हजार कोटी रुपयांचा निधी मिळून सुध्दा या शहराची लागलेली वाट ही चुकीच्या नियोजनामुळेच. अधिकारी, राजकीय मंडळी, खाजगी कंत्राटदार व नियोजन करणार्‍या कंपनीने फोटोसेशन आणि सादरीकरणाच्या माध्यमातून नांदेड शहर किती सुंदर दिसेल याचे रंगविलेले स्वप्न मात्र नांदेडकरांनी गेली तीन दिवस हाल सोसून पाहिले.

याबाबत मनपाचे विद्यमान आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, शहरातील सर्वच बाबीचा मी अभ्यास करत आहे. आणि त्यावरचा वस्तूनिष्ठ अहवाल तयार करणार आहे. बर्‍याचश्या बाबीवर खुप अभ्यास करुन निर्णय यायला व त्याची अंमलबजावणी व्हायला वेळ लागेल.