शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांमध्ये 30 कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा आरोप

जिल्ह्यात शिक्षकांची सुमारे १ हजार पदे रिक्त असताना ७५० शिक्षकांना जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले. त्यासाठी दोन वेळा सुधारीत शासन निर्णय काढण्यात आला. शिक्षकांच्या बदल्यांसाठी एवढ्या वेगाने शासन निर्णय कसे निघाले असा प्रश्न उपस्थित करत शिक्षक बदल्यांमागे मोठे रॅकेट असून जिल्हा परिषद ते मंत्रालय या साखळी मध्ये ३० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा असल्याचा आरोप शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केला. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणीही आमदार जाधव यांनी केली आहे.

जिल्हा नियोजनच्या बैठकीला आलेल्या भास्कर जाधव यांनी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त असतानाही, जिल्हा बदल्यांना प्राधान्य का देण्यात आले? या बदल्यांसाठी तातडीने दोन शासन निर्णय कसे काढण्यात आले? पहिल्या शासन निर्णयामध्ये शेवटी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय बदल्या करण्यात येऊ नयेत अशी टीप होती. परंतु तातडीने दुसऱ्या निर्णयामध्ये ही टीप काढण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व गोष्टींची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजनची शनिवारी झालेली बैठक खरे तर पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होती परंतु ती झाली नाही. शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारी खते, बियाणे किती लागणार याच्यावर काहीच झाले नाही. धोकादायक ठिकाणांचे स्थलांतर यावरही पावसाळ्यापूर्वी निर्णय अपेक्षित होते ते झाले नसल्याचे जाधव यांनी सांगितले.

गेल्या नियोजनला विरोधात असणारे आज त्यांच्या बाजुला जाऊन बसले होते. परंतु माझा आक्रमकपणा कमी होणार नाही असेही जाधव यांनी सांगितले. शासन आपल्या दारी कार्यक्रम करोडो रुपये खर्च करुन रत्नागिरीत करण्यात आला. यासाठी निधी कुठून आला. त्यादिवशी एसटी बसेसचे नियोजन कोलमडून पडले होते अशी टिकाही त्यांनी केली. मागील सत्ताधार्यांनी आणलेल्या योजनाच आज सरकार पुढे करीत आहेत, त्यात नावीन्य असे काहीच नसल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचा गाळ काढला जाणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.