पुणे मॅरेथॉन रविवारी, 12 हजाराहून अधिक धावपटूंचा सहभाग

हिंदुस्थानातील सर्वात जुनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा 37 व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही मॅरेथॉन डिसेंबरच्या पहिल्या रविवारी म्हणजे 3 डिसेंबरला पहाटे 3.30 वाजता सुरू होणार आहे. ‘पर्यावरण संवर्धनासाठी पळा’ हे यंदाचे घोषवाक्य असलेल्या या मॅरेथॉनमध्ये 12 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला आहे. केनिया, इथोपिया, टांझानिया, मलेशिया यांसह विविध देशांतील 70 आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच बॉम्बे सॅपर्स, एएसआय, सैन्यदल, रेल्वे, पोलीस यांतील धावपटू व महिला विभागात राष्ट्रीय विजेती ज्योती गवते, साक्षी भंडारी, भाग्यश्री भंडारी व शीतल भंडारीदेखील सहभागी होणार आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉइंट रेस डायरेक्टर रोहन मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी माजी महापौर दीप्ती चवधरी, माजी आंतरराष्ट्रीय धावपटू गुरुबन्स काwर व महाराष्ट्रीय मंडळाच्या नेहा दामले आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ सणस मैदानाजवळील कल्पना/विश्व चौक येथून समारंभपूर्वक होईल. ‘पर्यावरण संवर्धनासाठी पळा’ या घोषवाक्याच्या पार्श्वभूमीवर थायसन ग्रुपचे विशेष पथक या शर्यतीत पर्यावरण संवर्धन मोहिमेसाठी सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी ‘वुई क्रिएट लायवेबल प्लॅनेट’ असे घोषवाक्य असून तंदुरुस्तीसाठी एकत्र येऊन 100 हून अधिक अभियंते यामध्ये सहभागी होणार आहेत.