निवडणुकीवर बहिष्कार; 65 गावांतील 41 हजार मतदारांमध्ये रोष

राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असली तरी राज्यातील काही ठिकाणी निवडणूक आणि राज्यकर्त्यांविरोधात प्रचंड रोष आहे. या रोषातून 65 गावांतील 41 हजार मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. गेल्या पाच वर्षांत आम्हाला दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत, भागात वीज, पाणी आणि मोबाईल टॉवरची सुविधा नसल्याचे सांगत मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. बहिष्काराचे हे सत्र सुरूच राहिले तर त्याचा उमेदवाराला चांगलाच फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात तब्बल 65 गावांतील 41 हजार 440 मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. रस्ते, पाणी, मराठा आरक्षण, रेल्वेगाडी सुरू करावी अशा नागरिकांच्या मागण्या आहेत. बीडमध्ये एका गावाने तर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. आष्टी तालुक्यातील सुरूर्डी गावानेही गेल्या वीस वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्याने सामूहिक निवडणूक बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.

n मावळमध्ये रस्त्याच्या कामांसाठी कोंडीची वाडी येथील 70 ते 80 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर जमिनीच्या मोबदल्यासाठी हनुमान कोळीवाडा आणि करंजा गावातील 400 ते 450 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला.

n भिवंडी मतदारसंघातील मतदारांनी रस्ते, पाणी, लाईट आणि आरोग्य या मूलभूत सुविधा नसल्याने फुगाळे आणि दापूर येथील 3 हजार 466 मतदारांनी बहिष्कार टाकला आहे.

n ठाणे मतदारसंघात सिडकोने जमीन अधिग्रहण करूनही काम पूर्ण न केल्याने जमीन परत करावी नाहीतर पुनर्वसन करावे, या मागणीसाठी सावली गावातील 15 ते 20 मतदारांनी बहिष्कार टाकला आहे.

n बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार मोकाट जनावरांच्या समस्येने चांगलेच नाराज आहेत. या समस्येमुळे गावकऱयांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. मोढवे गावातील 2 हजार 700 मतदारांनी निवडणुकीवर या समस्येमुळे बहिष्कार घातला आहे.

n मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पान्हवळ गावातील 1200 ते 1300 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे तसेच दौंड शहराला उपनगरचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी 3 हजार ते 3 हजार 500 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

n शिरूरमध्ये भुयारी मार्गाच्या मागणीसाठी खोडद, हिवरे, नारायणगाव गावातील 1300 मतदारांनी बहिष्कार घातला आहे.

n माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी उपसा सिंचन योजनेसाठी निधी मंजूर करण्याच्या मागणीसाठी 35 ते 40 गावातील 20 हजार ते 25 हजार मतदारांनी बहिष्कार घातला आहे.

n छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी रस्त्याच्या मागणीसाठी औरंगपूर गावातील 70 मतदारांचा बहिष्कार घातला आहे. धाराशीवमधील मतदारांनी भूकंपानंतर पुनर्वसन झालेल्या गावातील गावकऱयांच्या घरकुलाच्या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील धनेगाव येथील 359 मतदारांनी बहिष्कार घातला आहे.