चांदोलीत गतवर्षीच्या तुलनेत 5.03 टीएमसी कमी पाणी; मार्च महिन्यात 3.76 टीएमसी पाण्याचा वापर

चांदोली धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 5.03 टीएमसी कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला (3 एप्रिल 2023) धरणात 16.45 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता, तोच पाणीसाठा यंदा 11.42 टीएमसी आहे. एक मार्च रोजी धरणात 15.32 टीएमसी पाणीसाठा होता. 31 मार्चला 11.56 टीएमसी राहिला आहे. मार्च महिन्यात 3.76 टीएमसी पाण्याचा वापर झाला.

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. त्यातच बाष्पीभवनामुळे पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. सध्या धरणात 11.42 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

एप्रिल महिन्यामध्ये वाकुर्डे बुद्रूक उपसा जलसिंचन योजनेसाठी पाणी सोडण्यात येणार असून, या महिन्यामध्ये किमान पाच टीएमसी पाणी वापरले जाईल. पुढील मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्यात सहा टीएमसी पाण्याचा वापर होईल, असे चित्र आहे. सध्या धरणात असणारा पाणीसाठा मेअखेरपर्यंत पुरेल, अशी शक्यता आहे. पाऊस लांबला तर जून महिन्यामध्ये पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण प्रशासनाला सध्याच्या शिल्लक पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे.

गतवर्षी आजच्या तारखेला धरणामध्ये एकूण 23.33 टीएमसी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी 67.80 टक्के होती. यंदा हाच पाणीसाठा 18.30 टीएमसी आहे. त्याची टक्केवारी 53.20 टक्के आहे. 14.69 टक्के पाणी यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.

लाखो लिटर पाणी जाते वाया
कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. मात्र, ठिकठिकाणी पोटकालवे फुटले आहेत. मुख्य कालव्यांमध्ये झाडाझुडपांचे साम्राज्य आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाटबंधारे विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. कालव्यामार्फत पाणी सोडल्यानंतर शेडगेवाडी येथील बोगद्यात तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. येणा ऱ्या-जाणा ऱ्या वाहनधारकांना येथे आल्यानंतर पावसाळ्याचा फील येतो. चांदोली-कराड मुख्य रस्त्यावरील ही वस्तुस्थिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष आहे. मग इतर ठिकाणच्या गळतीचा विषयच नाही. कालव्याला इतर ठिकाणीही मोठय़ा प्रमाणात गळती होऊन ओढे, नालेमार्गे पाणी वारणा नदीमध्ये जाताना दिसत आहे.

पाणी नियोजनाची गरज
उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे ठिकठिकाणचा पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. सध्या उन्हाची तीव्रता इतकी मोठी आहे की, काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्यावा लागत आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिका ऱ्यांनी वाकुर्डे बुद्रूक योजनेच्या पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले, तर शिराळा व वाळवा तालुक्यातील अनेक गावांची पिण्याचे आणि जनावरांच्या पाण्याची अडचण मिटणार आहे.