पुन्हा मास्क! कोरोनाने चिंता वाढली; देशभरात 640 नवे रुग्ण

कोरोनाने अनेक राज्यांत पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. देशभरात 24 तासांत 640 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच कोरोना विषाणूचा सबव्हेरिएंट जेएन-1 बाधित रुग्णांची संख्या 23 झाली आहे. विषाणूच्या या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जनतेने मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करावे, अशा सूचना डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी केल्या आहेत.

पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या 24 तासांत 640 नवीन रुग्ण आढळले. त्यात 235 रुग्ण केरळमध्ये आहेत. देशात सध्या ऑक्टिव्ह रुग्ण संख्या 2997 झाली आहे. सबव्हेरिएंट जेएन-1चा पहिला रुग्णही केरळमध्येच आढळला आहे. केरळपाठोपाठ उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढत आहे.

जेएन-1 सबव्हेरिएंटच्या संसर्गामुळे चिंता करण्याची गरज नाही, मात्र कोरोनाप्रमाणेच काळजी घेणे आवश्यक आहे. नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माजी मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. न्युमोनिया, श्वसनासंबंधी आजार असल्यास दक्षता घ्यावी. मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी, असेही तज्ञांनी म्हटले आहे.

सांगलीत दांपत्याचा अहवाल पॉझिटिव्ह

शहरातील विश्रामबाग परिसरात दांपत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपका&तील 14 जणांची चाचणी करण्यात आली.

उत्सव काळात संसर्गाचा धोका

– केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तीन दिवसांपूर्वीच अॅडव्हायजरी जारी करून सण आणि उत्सव काळात संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्यांना केल्या आहेत.
– इन्फ्ल्युएंझा, श्वसनाचे आजार यासंबंधीची प्रत्येक जिल्हय़ांची माहिती नियमितपणे घ्यावी. आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी राज्यांनी उपाययोजना कराव्यात, असेही यात म्हटले आहे.

काय आहे स्थिती…

कोरोना सबव्हेरिएंट जेएन-1 बाधित रुग्णांची संख्या 24 झाली आहे. गोव्यात 21 रुग्ण असून एक केरळ, एक ठाणे, एक रुग्ण सिंधुदुर्गात आढळला आहे.

तेलंगणात चार रुग्ण आढळले, राजस्थानात ऑस्ट्रेलियातून आलेला विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहे.

कर्नाटक सरकारने आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून चाचण्या वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

मध्य प्रदेशातही चार रुग्ण आढळले. सार्वजनिक ठिकाणी वावरताना लोकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.