
>> स्वाती विप्रदास
संतचरण रज, लाभता सहज ।।
वासनेचे बीज, जळून जाय ।।
खग रामनामे, उपजे आवडी ।।
सुख घडोघडी, वाढो लागे ।।
संतचरण लाभले की, आयुष्य उजळते. संतकर्म, सदाचरण, सदसद् विवेक या सवयी संत शिकवत असतात. लख्ख उजेडात आयुष्याचा रस्ता चालता येतो. मनातले भ्रम, वाईट विचारांचे जळमटे, पाप कुठल्या कुठे निघून जातात. नकारात्मक विचारांना मनात राहता येत नाही. प्रसन्नतेची ऊर्जा संतकृपेने दिसते.
दि. 18 ते 26 एप्रिल या कालावधीत संत श्रीसद्गुरू शंकर महाराज यांचा 79 वा समाधी सोहळा साजरा होत आहे. इतकी वर्षे झाली महाराजांनी समाधी घेऊन; पण दिवसेंदिवस मठात येणाऱया भाविकांची गर्दी वाढत आहे. आश्चर्य असे की, जो शंकर मठात येऊन नतमस्तक होतो तो स्वतःला आधार मिळाला आहे, असे निर्भय वागू लागतो. आपला कोणीतरी आधार आहे याची चाहूल त्याला होते आणि त्याचे नाते महाराजांशी घट्ट बनते आणि तो बिनधास्तपणे जगू लागतो. माझा पाठीराखा मठात आहे हे त्याला समजते आणि मठाकडे जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन पूर्ण विचार करू लागतो.
प्रचंड गर्दीचा लोट मठात असतोच, पण या सात दिवसांत मोठय़ा संख्येने भाविक गर्दी करतात.माझे शंकरबाबा असे प्रत्येकालाच वाटत असते. हा एक साक्षात्कारच आहे. तोच खरा आधार आहे जगण्याचा. बाबांच्या सहवासात प्रत्येक जण आनंदाने जगत असतो. मनातील ताणतणाव पुठच्या पुठे निघून जातात. आनंदाने जगण्यात किती ताकद आहे, याचा अनुभव येतो साधकाला. मनातील शंका, वैर, भीती, असमाधान कुठच्या कुठे निघून जातात. जगण्याचा मार्ग सापडतो. जणू दिवाळीचा सण आला आहे, असे वाटते. पहाटे काकड आरती, दुपारी आणि सायंकाळी आरती, अशी त्रिकाळ आरती होते. रुद्रायण, भजन, कीर्तन, प्रवचन, गायन असा दिवसभर भरगच्च धार्मिक कार्यक्रम असतो. सात दिवस अखंडवीणा असते. सात दिवस सात मिनिटांसारखे वाटतात. सडा, रांगोळ्या, सनई-चौघडा वादन कितीही वर्णन केले तरी कमी पडेल. प्रत्येकात शंकरनामाची ऊर्जा भरलेली दिसते. उत्साहाचा भरपूर पूर वाहत असतो. भक्तीचे दर्शन होते. संतचरण किती सामर्थ्य देतात याची अनुभूती येत असते. अहंकार गळून जातो आणि ज्ञानाचा प्रकाश पडलेला दिसतो. या सात दिवसांत येणारा प्रत्येक जण यथाशक्तीप्रमाणे अन्नदान करत असतो. येणाऱया शिध्यातून जो प्रसाद तयार होतो तो महाराजांचा आशीर्वादच असतो. तो प्रसाद प्रत्येकाला मिळतो.
विकारांना शमवतात ते संत. ज्याने स्वतःला ओळखले तोच महाराजांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्यातील विकार दूर व्हावेत म्हणून संतचरण कधी सोडूच नयेत. संत म्हणजे आई. आत्मविश्वास बळकट करतात आणि धैर्य-बल-साहस देतात.
“अवघा रंग एकचि झाला
रंगी रंगला श्रीरंग ।।’’
असे चित्र पहायला मिळते.
‘ज्याने धरले सद्गुरू चरण, त्याचे चुकले जन्म-मरण’ या ओळींप्रमाणे संतचरण तरणोपाय आहेत ही प्रचीती येते. मोठय़ा अन्नदान सोहळ्यात प्रत्येकाला सहभागी होण्याची इच्छा असते. जमेल तसे यथाशक्ती अन्नदान आलेला साधक करत असतो. सगळे मिळून होणाऱ्या प्रसादाला सद्गुरूंचा आशीर्वाद असतोच. त्या प्रसाद सेवनाचे समाधान प्रचंड असते.
कितीही लिहिले तरी संपणार नाही असे वर्णन आहे सद्गुरूंचे किती वर्णन करू असे वाटत राहते. कित्येकांचे अनुभव आहेत. कोणाचा व्यवसाय, कोणाची नोकरी, कोणाचा संसार…हे फक्त आणि फक्त महाराजांच्या कृपेमुळेच सुरू आहे, असा भाव भक्तांच्या मनात आहे!































































