मुद्दा – ‘डिजिटल नशे’वर नियंत्रणाची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्नेहा अजित चव्हाण

आजच्या वेगवान युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेम्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. ज्ञान, संवाद आणि मनोरंजन यासाठी ही साधने उपयोगी असली तरी कळत-नकळत अनेक मुलं, तरुण आणि अगदी पालकही डिजिटल नशेच्या विळख्यात अडकत आहेत. ही नशा दिसत नाही, पण तिचे परिणाम मात्र गंभीर असतात.

मी एक शिक्षिका आणि समुपदेशिका म्हणून शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेकदा अनुभवते की, काही मुलं अभ्यासात लक्ष देऊ शकत नाहीत, सतत मोबाईल पाहतात, रात्री उशिरापर्यंत गेम खेळतात, सकाळी थकलेले दिसतात. त्यांना स्वतःलाही कळत नाही की, ही सवय हळूहळू व्यसनात बदलत आहे.

कळत-नकळत लागलेली डिजिटल सवय

सुरुवातीला मुलांना मोबाईल दिला जातो – “थोडा वेळ कार्टून बघ’’, “गेम खेळ’’, “यूटय़ूबवर शिक’’ अशा कारणांनी, पण हा ‘थोडा वेळ’ हळूहळू तासांमध्ये बदलतो.

  • नोटिफिकेशनचा आवाज आला की, लगेच फोन हातात.
  • रात्री उशिरापर्यंत रील्स पाहणे.
  • अभ्यासाऐवजी गेम खेळणे.
  • कुटुंबीयांशी संवाद कमी होणे.
    ही सवय नकळत मनाचा ताबा घेते.

डिजिटल नशेचे परिणाम

अभ्यासावर परिणाम – लक्ष केंद्रित होत नाही, गुण कमी होतात.

मानसिक आरोग्य – चिडचिड, नैराश्य, एकटेपणा, आत्मविश्वास कमी होणे.

शारीरिक त्रास – डोळ्यांना त्रास, डोकेदुखी, झोप न लागणे.

सामाजिक तुटलेपणा – मित्र, कुटुंब, नातेवाईकांपासून दुरावा.

आक्रमकता – गेम हरल्यावर राग, हिंसक वर्तन.

एक उदाहरण

एक इयत्ता दहावीचा विद्यार्थी रोज रात्री 3 वाजेपर्यंत ऑनलाइन गेम खेळायचा. बोर्ड परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत. तो नैराश्यात गेला. समुपदेशन आणि पालकांच्या सहकार्याने हळूहळू मोबाईल वेळ कमी केला, अभ्यासाचे नियोजन केले आणि पुढच्या परीक्षेत चांगले यश मिळवले.

एक दुसरी विद्यार्थिनी सोशल मीडियावर तुलना करत राहायची. स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण झाला. तिला काऊन्सेलिंग, योगा आणि मोबाईल-फ्री वेळ दिल्यावर ती पुन्हा आनंदी झाली.

जर आपण आताच नियंत्रण ठेवले नाही तर काही वर्षांत डिजिटल व्यसनासाठी रिहॅब सेंटरमध्ये मुलं, तरुण, पालक यांना दाखल करावे लागेल. जशी दारू किंवा ड्रग्जची सवय लागते, तशीच हीही नशा आहे, पण अधिक धोकादायक. कारण ती घरातच वाढते.

नियंत्रणासाठी उपाय

1. पालकांसाठी

  • मुलांना मोबाईल देण्याची वेळ ठरवा.
  • रात्री मोबाईल वेगळ्या ठिकाणी ठेवा.
  • स्वतःही मोबाईल कमी वापरा (आदर्श बना).
  • मुलांशी रोज 15 मिनिटे संवाद करा.

2. विद्यार्थ्यांसाठी

  • 2 तासांपेक्षा जास्त स्क्रीन टाइम टाळा.
  • अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.
  • खेळ, वाचन, चित्रकला, संगीत यांसारखे छंद जोपासा.
  • झोपण्यापूर्वी मोबाईल वापरू नका.

3. शाळांसाठी (मी शिक्षक म्हणून वापरत असलेले उपक्रम)

  • मोबाईल-फ्री डे
  • स्वयंअध्ययन उपक्रम
  • काऊन्सेलिंग सत्र
  • डिजिटल साक्षरता कार्यशाळा
  • पालक-शिक्षक बैठक

डिजिटल साधने वाईट नाहीत; त्यांचा अतिरेक वाईट आहे. मुलांना बंदी नाही, तर दिशा द्या. राग नाही, तर संवाद द्या. शिक्षा नाही, तर समज द्या. आपल्या मुलांचे भविष्य आपल्या हातात आहे. आज आपण नियंत्रण ठेवले तर उद्या त्यांना रिहॅब सेंटरमध्ये नेण्याची वेळ येणार नाही. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी, मोबाईल हातात असताना मुलांचा हात सुटू देऊ नये. स्क्रीनची चमक त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांची चमक कमी करेल, असे होऊ देऊ नका. आज एक छोटा नियम, एक छोटा संवाद, एक छोटा बदल – उद्या मोठे यश देईल. चला, डिजिटल नशेवर नियंत्रण ठेवू आणि आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करू!