
लालबाग, परळ आणि मेघवाडी परिसरातील शाळा आणि मनोरंजन मैदानावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर आज पालिकेने बुलडोझर फिरवला. हा भूखंड मोकळा करण्यासाठी गेल्या 12 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या कारवाईमुळे मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील सुमारे 50 हजारांहून अधिक नागरिकांसाठी मनोरंजन मैदान खुले होणार आहे.
पालिकेच्या एफ (दक्षिण) विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार परिमंडळ-2चे उपआयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणानुसार पर्यायी सदनिका किंवा स्थानिक सिद्ध गणक दरानुसार (रेडी रेकनर रेट) आर्थिक मोबदला यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याबाबत कळविण्यात आले होते.
अशी झाली कारवाई
या ठिकाणच्या एकूण 13 बांधकामांपैकी 7 बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित 6 बांधकामांच्या तोडकामाची कारवाई लवकरच करण्यात येईल. अतिक्रमण निर्मूलनासाठी आज 2 जेसीबी, 1 डंपर, 1 रुग्णवाहिका आणि अन्य संयंत्रे वापरण्यात आली. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे 45 अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.































































