एसटी महामंडळात पाण्याचा ठणठणाट! टँकर पाणी पुरवठा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल येथील बसस्थानकावर सध्या पाणीकपातीचे संकट निर्माण झाले आहे. आधीच पालिकेच्या अपुरा पाणीपुरवठय़ामध्ये काटकसर करणाऱ्या एसटी महामंडळाला टँकरच्या संपाचा मोठा फटका बसला आहे. जवळपास 5 हजार प्रवासी व शेकडो एसटी कर्मचाऱ्यांना पाणी उपलब्ध करणे महामंडळाला अशक्य बनल्याची गंभीर स्थिती उद्भवली आहे.

मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या बस स्थानकावरून दररोज राज्यभरात 250 हून अधिक बसेसची येजा सुरू असते. पिण्याचे पाणी तसेच प्रसाधनगृह व शौचालयाला मुबलक पाणी उपलब्ध नसल्याची तक्रार प्रवासी एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र आधीच महापालिकेने लागू केलेली 10 टक्क्यांची पाणीकपात आणि आता टँकर असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे बसस्थानकात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. बसस्थानक, महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय आणि कार्यशाळा अशा विविध इमारतींसाठी पाण्याच्या भूमिगत चार टाक्या आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे चारपैकी दोन टाक्यांमध्ये ठणठणाट निर्माण झाला आहे.

एसटी महामंडळ पाणी उपलब्ध करण्यासाठी पैसे देण्यास तयार आहे. त्यानुसार पैसे मोजल्यानंतर पालिकेने एकदा 10 हजार लिटर पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. त्या एका टँकरनंतर पुन्हा टँकर मिळवणे मुश्किल झाल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटीची प्रवासी सेवा आपत्कालीन सेवेत मोडते. त्यामुळे किमान महामंडळासाठी टँकरचालकांना पाणीपुरवठय़ाच्या सूचना देण्यात याव्यात, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

अधिकाऱ्यांनाही पाणी जपून वापरण्याच्या सूचना

पाण्याच्या टंचाईची झळ एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बसली आहे. सर्व कर्मचाऱयांबरोबरच अधिकाऱयांनाही पाणी जपून वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी वारंवार टँकर चालकांच्या संपका&त आहोत. सुरळीत पुरवठय़ासाठी प्रयत्न करीत आहोत, असे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी सांगितले.

विश्रांतीगृहातील चालक, वाहक आंघोळीविना

मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या इमारतीतील दोन मजल्यांवर राज्यभरातून येणाऱया चालक आणि वाहकांच्या सोयीसाठी विश्रांतीगृहाची व्यवस्था आहे. दररोज किमान 200 ते 300 चालक-वाहक विश्रांतीगृहात मुक्कामाला असतात. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पाणी नाही. 10 ते 12 तास डय़ुटीमुळे थकलेल्या संबंधित कर्मचाऱयांना आंघोळीविना राहावे लागत आहे.