3 बाद शून्य… कांगारूंचा बाजार उठला; खातं उघडण्याआधीच 3 फलंदाज तंबूत; 23 वर्षांनंतर लाजिरवाण्या रेकॉर्डची पुनरावृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक दिवसीय क्रिकेट ‘राजा’ अशी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाची ओळख आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सहा वेळा एक दिवसीय विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले आहे. मात्र गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियन संघ संक्रमणाच्या अवस्थेतून जात असून याचा परिणाम कामगिरीवरही होत आहे. याचाच प्रत्यय बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या एक दिवसीय मालिकेमध्ये येत आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय लढतीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील काळा अध्याय लिहिला गेला.

ढाका येथील शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था खराब झाली. धावफलकावर एकही धाव नसताना ऑस्ट्रेलियाने आपले पहिले 3 फलंदाज गमावले. एकदिवसीय क्रिकेटच्या 50 वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ इतिहासात अशी लाजिरवाणी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील केवळ चौथा संघ ठरला आहे.

23 वर्षांपूर्वीच्या रेकॉर्डची पुनरावृत्ती

क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी 2003 च्या विश्वचषकात अशी घटना घडली होती. विशेष म्हणजे तेव्हा हा नकोसा रेकॉर्ड बांगलादेशच्या नावावर नोंदवला गेला होता. श्रीलंकेच्या चामिंडा वासने सामन्याच्या पहिल्या तीन चेंडूंवर हॅट्ट्रिक घेत बांगलादेशची अवस्था 3 बाद शून्य अशी केली होती. आज त्याच बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला शून्यावर तीन धक्के दिले आणि 23 वर्षांपूर्वीच्या रेकॉर्डची पुनरावृत्ती झाली.

एकामागोमाग तीन विकेट्स

सामन्याची सुरुवात ऑस्ट्रेलियासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखी झाली. डावाच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर तस्कीन अहमदने मॅथ्यू शॉर्टला बोल्ड केले. यानंतर मुस्तफिजुर रहमानने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कूपर कोनोली शून्यावर बाद केले. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅट रेनशॉ याला देखील मुस्तफिजूरने विकेटच्या मागे बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था दोन षटके, शून्य धावा आणि 3 विकेट्स अशी दयनीय झाली होती.

बांगलादेश ऐतिहासिक मालिका विजयाच्या उंबरठ्यावर

मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा 86 धावांनी (DLS पद्धत) पराभव करून आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलल्यामुळे यजमान बांगलादेश संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे.