इलेक्ट्रिक बसचे अपघात चक्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश शिपेकर

सध्याच्या इंधन टंचाईच्या काळात विद्युत वाहने वरदान ठरत आहेत खरी; पण या वाहनांच्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढत चालले आहे. मुंबईतील दादर पश्चिम भागात अलीकडेच बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी झाले. मुंबईत डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान झालेल्या दोन मोठय़ा इलेक्ट्रिक बस अपघातांमध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला. यामागे तांत्रिक बिघाडाबरोबरच चालकांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव हेही प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. चालकांना या अत्याधुनिक बसेस देण्यापूर्वी त्यांना कठोर रोड टेस्ट देणे गरजेचे आहे.

भारतात सध्या हरित क्रांती आणि प्रदूषण मुक्तीच्या नावाखाली पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसचा (ई-बसेस) वापर मोठय़ा प्रमाणावर वाढवला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध योजनांतर्गत देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी हजारो इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावत आहेत. मात्र, या इलेक्ट्रीकरण आणि आधुनिकतेच्या वेगासोबतच एक अत्यंत चिंताजनक वास्तव समोर आले आहे, ते म्हणजे इलेक्ट्रिक बसेसचे होणारे भीषण आणि प्राणांतिक अपघात.

मुंबईतील दादर पश्चिम भागात अलीकडेच बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त बसचा चालक मार्च 2021 पासून तो ईव्ही ट्रान्स (ओलेट्रा) कंपनीत कार्यरत असून इलेक्ट्रिक बस चालविण्याचा त्याला अनुभव असल्याचे बेस्टने स्पष्ट केले. चालकांना इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षित संचालनाबाबत नियमित प्रशिक्षण देण्यात येते, असेही सांगण्यात आले. अपघाताच्या आधी संबंधित इलेक्ट्रिक बसचा वेग ताशी 15 ते 16 किलोमीटरवरून अचानक वाढून ताशी 24 किलोमीटरवर पोहोचल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाच्या अंतर्गत तांत्रिक तपासणीनंतर सांगण्यात आले. बसमध्ये बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक इंटेलिजेंट ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टमच्या नोंदीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटण्यापूर्वी बसचा वेग ताशी 15 ते 16 किमी होता. मात्र क्रेनला धडकण्याच्या अचूक क्षणी हा वेग ताशी 24 किमी इतका नोंदवला गेला.

गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक बसेसचे अपघात वाढत चालल्याचे दिसून येत असल्याने शासनाने याची गांभीर्याने दखल घेत उपाययोजना करण्याची गरज आहे. ऑगस्ट 2025 पर्यंतच्या अवघ्या 15 महिन्यांच्या कालावधीत एकटय़ा बंगळुरू शहरात सार्वजनिक इलेक्ट्रिक बसेसचे तब्बल 18 अपघात नोंदवले गेले होते आणि यामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मुंबईत डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान झालेल्या दोन मोठय़ा इलेक्ट्रिक बस अपघातांमध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला. ही समस्या केवळ मेट्रो शहरांपुरती मर्यादित नसून एप्रिल 2025 मध्ये गुजरातमध्ये एका सुसाट इलेक्ट्रिक बसने चार जणांचा बळी घेतला, तर जानेवारी 2026 मध्ये ओडिशामध्ये एका उभ्या रिक्षाला इलेक्ट्रिक बसने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला. या सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इलेक्ट्रिक बसच्या सर्व अपघातांचे सखोल विश्लेषण केले असता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे या अपघातांना इलेक्ट्रिक बसचे तांत्रिक डिझाईन किंवा बॅटरीचे तंत्रज्ञान कारणीभूत नसून अपुरे चालक प्रशिक्षण हे सर्वात मुख्य कारण आहे. ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया’च्या अहवालानुसार, पारंपरिक आणि इलेक्ट्रिक, दोन्ही बसेसच्या अपघातांमध्ये सुमारे 60 टक्के अपघात हे चालकांच्या चुकीमुळे होतात. परिवहन तज्ञांच्या मते, भारतातील इलेक्ट्रिक बसेस सरकारी चाचण्या आणि प्रमाणपत्रांच्या कसोटीवर परिपूर्ण ठरल्या आहेत. या बसेस बनवणाऱ्या नामांकित कंपन्या चीन आणि पोलंडसारख्या देशांमध्येही कोणत्याही अपघाताशिवाय बसेस चालवत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाला दोष देणे सोपे असले तरी खरी समस्या चालकांच्या प्रशिक्षणात आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीत दडलेली आहे.

इलेक्ट्रिक बस चालवणे हे डिझेल किंवा सीएनजी बस चालवण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गती घेण्याची क्षमता (सडन अॅक्सिलरेशन) अत्यंत तीव्र असते. डिझेल गाडय़ा हळूहळू गती घेतात. मात्र इलेक्ट्रिक बस अॅक्सिलरेटर दाबताच क्षणात प्रचंड वेग पकडते. तसेच त्यांची ब्रेक यंत्रणाही (हार्ड ब्रेकिंग) अतिशय संवेदनशील असते. जर चालकाला या नवीन दळणवळण प्रणालीचे (ड्राइव्हट्रेन) योग्य आकलन नसेल तर गर्दीच्या ठिकाणी किंवा चौकांमध्ये अॅक्सिलरेटर आणि ब्रेकचा ताळमेळ बिघडतो. काही अपघातांच्या प्राथमिक तपासणीतही चालकाने ब्रेकऐवजी चुकून अॅक्सिलरेटर दाबल्याचे समोर आले आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक बसेस पूर्णपणे शांत (जवळपास आवाज न करता) धावतात. पारंपरिक बसेसचा आवाज ऐकून पादचारी किंवा दुचाकीस्वार बाजूला होतात, मात्र ई-बसचा आवाज येत नसल्याने रस्त्यावरील लोकांना तिच्या वेगाचा अंदाज येत नाही. हेही अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत चालकांना अत्यंत सावधगिरीने गाडी चालवण्याचे (डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग) प्रशिक्षण मिळणे आवश्यक असून याची भारतात मोठी कमतरता आहे.

भारतातील बहुतांश राज्य परिवहन संस्था या इलेक्ट्रिक बसेस स्वत खरेदी न करता ‘ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट’ मॉडेल अंतर्गत खासगी कंपन्यांकडून भाडेतत्त्वावर घेतात. या मॉडेलनुसार, बसेस पुरवणे, त्यांची देखभाल करणे आणि चालक नेमणे ही सर्व जबाबदारी खासगी कंत्राटदारांची असते. हे खासगी कंत्राटदार कंत्राट मिळवण्यासाठी अत्यंत कमी किमतीची बोली लावतात आणि त्यानंतर खर्च वाचवण्यासाठी चालकांच्या वेतनात मोठी कपात करतात. उदाहरणार्थ, बंगळुरू परिवहन मंडळाचे अधिकृत चालक जेवढे कमावतात, त्यापेक्षा खासगी कंत्राटदारांचे चालक अत्यंत कमी वेतनावर काम करतात. कमी पगार आणि कामाचे अनिश्चित तास यामुळे या क्षेत्रात चांगल्या आणि अनुभवी चालकांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.

कंत्राटदार कंपन्या अनेकदा बस चालकाची पार्श्वभूमी किंवा त्याचा इलेक्ट्रिक वाहनांचा अनुभव न तपासता केवळ अवजड वाहन परवाना पाहून त्याची थेट भरती करतात. इलेक्ट्रिक बसचे अनेक चालक हे मालवाहू ट्रक किंवा ट्रॅक्टर चालवण्याच्या पार्श्वभूमीतून आलेले असतात. त्यांना शहरातील गर्दीत प्रवाशांची बस चालवण्याचा कोणताही अनुभव किंवा संयम नसतो. युरोप आणि अमेरिकेत चालकांना अशा बसेस देण्यापूर्वी सिम्युलेटरवर कठोर प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली जाते. मात्र भारतात अशी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. कंत्राटदारांकडून चालकांवर कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याचा दबाव असतो. कामाचे वाढीव तास, अपुरी विश्रांती आणि चालकांचा थकवा (ड्रायव्हर फटिग) यामुळे ऐन प्रवासात चालकाचे नियंत्रण सुटते आणि भीषण अपघात घडून येतात.

भारतात सद्यस्थितीत पन्नासहून अधिक शहरांमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत आणि आणखी 20 हजार बसेस खरेदी प्रक्रियेत आहेत. हा वेगाचा विस्तार कौतुकास्पद असला तरी चालकांच्या प्रशिक्षणाचे आणि सुरक्षेचे नियमन केल्याशिवाय हा विस्तार झाल्यास तो मानवी जिवावर बेतणारा ठरेल. सरकारी परिवहन मंडळांनी केवळ कंत्राट देऊन आपली जबाबदारी संपवली असे न मानता खासगी चालकांच्या कामाच्या तासांवर आणि त्यांच्या प्रशिक्षणावर डिजिटल प्रणालीद्वारे कडक देखरेख ठेवली पाहिजे.

अपघातांशिवाय इलेक्ट्रिक बसेसना आगी लागण्याचे प्रकारही घडले असून त्यामध्ये निष्पाप प्रवाशांचा मृत्यूही झाला आहे. वाहतूक क्षेत्राचा मुख्य उद्देश केवळ महसूल वाढवणे, इंधनाची बचत करणे किंवा किलोमीटर पूर्ण करणे हा नसून रस्त्यावरील प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित ठेवणे हा असायला हवा. जोपर्यंत चालकांचे कौशल्य सुधारण्यावर आणि त्यांच्या कामाच्या वातावरणातील ताण कमी करण्यावर ठोस काम होत नाही, तोपर्यंत भारताची ही हरित क्रांती अपघातांच्या सावटाखालीच राहील.

मुंबईत झालेल्या गेल्या काही काळातील प्रमुख प्राणांतिक अपघातांमध्ये एक समान आकृतिबंध (पॅटर्न) दिसून आला आहे. हे सर्व अपघात स्वयंचलित गीअर (ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) असलेल्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसचे झाले आहेत. यामध्ये वाहनाचा वेग अचानक वाढल्याने चालकाचे नियंत्रण सुटते. सीएनजी किंवा डिझेल गाडय़ांच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाडय़ांमध्ये हे प्रमाण अधिक जाणवत असल्याने चालकांना या अत्याधुनिक बसेस देण्यापूर्वी त्यांना सखोल प्रशिक्षण आणि कठोर रोड टेस्ट देणे गरजेचे आहे.

(लेखक वाहन उद्योग अभ्यासक आहेत)