
‘हिंदुस्थान हिटरलच्या विचारांवर चालत नाही. तो आपला स्वभाव नाही आणि मार्गही नाही. त्यामुळे पाकिस्तानशी चर्चेची दारे आपण कायम खुली ठेवायला हवीत,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना भागवत यांनी ही भूमिका मांडली. ‘पाकिस्तानच्या बाबतीत केंद्र सरकारचे धोरण हेच आमचे धोरण आहे. आमचे कुठलेही वेगळे परराष्ट्र धोरण नाही. होसबाळे जे बोलले ते पाकिस्तानी जनतेच्या अनुषंगाने बोलले. पाकिस्तानात आजही अनेक लोक असे आहेत जे फाळणीच्या विरोधात आहेत. देश एकसंध राहायला हवा होता असे त्यांना वाटते, असा दावा भागवत यांनी केला.
‘भविष्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला तर अशा परिस्थितीत दोनच पर्याय उरतात. तेथील लोकांना हिंदुस्थानात सामावून घ्यावे लागेल किंवा तिथेच त्यांची शांततापूर्ण व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले ठेवावे लागतील. ‘आपल्याला अन्याय आणि अत्याचाराचा नायनाट केला पाहिजे, पण ते करताना जे काही चांगले आहे तेही जपले पाहिजे,’ असे भागवत म्हणाले.


























































