
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात कोट्यवधी रुपयांची चोरी झाल्याचा दावा समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय एसआयटीची समिती नेमली आहे. अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) ने मंदिराच्या दानपेट्यांतील देणग्या दानपत्रांतून बँक खात्यांपर्यंत कशा पोहोचतात, याची सविस्तर तपासणी केली.
प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन एसआयटी अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातच दानपेट्यांची तपासणी केली. दानपेटी कशी उघडली जाते? रक्कम कशी गोळा केली जाते? पैशांची मोजणी कशी केली जाते? या सगळ्या प्रक्रियेची सखोल तपासणी एसआयटीच्या पथकाने केली. ही तपासणी तब्बल आठ तास चालू होती. एसआयटीच्या पथकाने दानपेटीत थेट हात घालून पैसे काढता येतात का? हे देखील प्रत्यक्ष करून पाहिले. परंतु पैसे निघाले नाहीत. एसआयटीच्या पथकाने या कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्याच्या वेळा तपासल्या. कर्मचारी कधी येतात? कधी जातात? कोणत्या नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली? कोणत्या कर्मचाऱ्यांनी काम सोडले? अशी मागील संपूर्ण वर्षाची माहिती त्यांनी घेतली.
टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असताना मंदिर न्यासाच्या व्यवस्थापकांपैकी एक असलेले गोपाळ राव मात्र अचानक तिथून निघून गेले.



























































