कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, वांद्रे येथे मेट्रो मार्गिकेच्या बांधकामादरम्यान आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पूर्व परिसरात ‘मेट्रो-2 ब’ मार्गिकेच्या बांधकामादरम्यान सोमवारी रात्री 10.52 वाजण्याच्या सुमारास आग लागली. वांद्रे पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. आगीची खबर मिळताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, या घटनेने मेट्रो मार्गिकेचे काम करणाऱ्या कंत्राटदार मेसर्स जे. कुमार कंपनीचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला.

आगीची तीव्रता मोठी होती, परंतु वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य अनर्थ टळला. मुंबईसह संपूर्ण महानगरात विविध मेट्रो मार्गिकांचे बांधकाम सुरू होते. या मार्गिकांच्या कामादरम्यान यापूर्वी विविध अपघात घडले आहेत. त्या घटनांमुळे बांधकाम ठिकाणच्या सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर आला. सोमवारी रात्री पुन्हा मेट्रो मार्गिकेच्या बांधकाम ठिकाणी लाकडी साहित्याला आग लागल्याने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कंत्राटदार जे. कुमारचा निष्काळजीपणा यापूर्वीही उघड झाला होता. त्यानंतरही एमएमआरडीए प्रशासन संबंधित कंत्राटदारावर सुरक्षात्मक खबरदारी घेण्याच्या दृष्टीने कठोर नियंत्रण ठेवू न शकल्याचे बोलले जात आहे.

जे. कुमार कंपनीकडून सातत्याने निष्काळजीपणा

वांद्रेमध्ये आग लागलेल्या मेट्रो मार्गिकेच्या टप्प्याचे काम जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस् कंपनीकडे आहे. या कंपनीच्या निष्काळणीपणामुळे मेट्रो तसेच इतर प्रकल्पांच्या कामादरम्यान सातत्याने अपघात घडले आहेत. दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो-9च्या कामादरम्यान निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघात झाला आणि त्यात 7 जणांचा जीव गेला होता.

एमएमआरडीएकडून चौकशी सुरू

आगीत मेट्रोच्या संरचनेचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा एमएमआरडीएने केला. आगीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्याचअनुषंगाने एमएमआरडीएने आगीचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंती कंपनीवर कठोर कारवाई केली जाणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.