
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा हिंदुस्थानी वंशाच्या असणे आवश्यक आहे. 1 जुलैपासून हा नियम लागू होणार आहे.
‘सीबीएसई’ने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि एनसीएफनुसार भाषा शिक्षणात मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार याआधी सीबीएसईने एप्रिल महिन्यापासून सहावीच्या वर्गातही त्रिभाषा सूत्र नियम लागू केला होता. यानंतर आता सीबीएसई शाळांमध्ये नववी आणि दहावीत तीन भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत सीबीएसईने 15 मे रोजी परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान, जोपर्यंत नववीसाठी त्रिभाषेची वेगळी पुस्तके उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी निवडलेल्या भाषेसाठी इयत्ता सहावीची 2026-27 ची पुस्तके वापरू शकतील.
नियम काय सांगतो…
सीबीएसईने जारी केलेल्या परिपत्रकानुसार एखाद्या विद्यार्थ्याला परदेशी भाषा शिकायची असल्यास त्याला आधी दोन हिंदुस्थानी भाषा ज्ञात असाव्या लागणार आहेत, अन्यथा परदेशी भाषेला चौथी अतिरिक्त भाषा म्हणून शिकवली जाईल, असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.


























































