अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू, 15 हून अधिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादच्या महमूदपुरा येथे फटाक्यांच्या कारखान्याला शनिवारी भीषण आग लागली. या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शर्थीचे प्रयत्न करत अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील वस्त्र भागातील रामोल-गटराड रस्त्यावर असलेल्या महमूदपुरा येथील टॅलेंट फायरवर्क्स कारखान्यात दुपारच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. फटाक्यांचा कारखाना असल्याने आग झपाट्याने पसरली. यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

महमूदपुरा येथे मेहुल डोडिया नावाचा एक व्यक्ती फटाक्यांचा कारखाना चालवत होता. या फटाक्यांच्या कारखान्याचा परवाना रद्द होऊनही तो बेकायदेशीरपणे सुरू होता. कारखान्यात आग लागल्यानंतर बचाव कार्यासाठी आरएएफचे जवान सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले, असे सह पोलीस आयुक्त जयपाल सिंग यांनी सांगितले.