
हिंदुस्थानी अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असा आहे. हिंदुस्थानातील पहिली खासगी स्पेस कंपनी स्कायरूट एअरोस्पेसने आपले रॉकेट विक्रम-1 ची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. पूर्णपणे स्वदेशी विकसित करण्यात आलेल्या ऑर्बिटल क्लास रॉकेट विक्रम-1 ने आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या प्रथम लाँच पॅडवरून यशस्वी उड्डाण करत ही ऐतिहासिक कामगिरी केली.
याआधी हे प्रक्षेपण साडेअकरा वाजता होणार होते, परंतु प्रक्षेपणाच्या पाच मिनिटे आधी काऊंटडाऊन थांबवण्यात आले. काही काळ थांबवल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. कंपनीने 2022 मध्ये विक्रम-एस सबऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपित केले होते, जे 89.5 किमी उंचीपर्यंत पोहोचले होते.
आता विक्रम-1 पृथ्वीच्या 450 किमीच्या वर्तुळाकार खालच्या कक्षेत पोहोचले आहे. विक्रम-1 पूर्णपणे हलक्या आणि मजबूत कार्बन-कंपोझिट संरचनेने बनवलेले पहिले ऑर्बिटल रॉकेट आहे. कार्बन फायबर स्टीलच्या तुलनेत पाचपट हलके असते. यामुळे रॉकेटचे वजन कमी होते, ज्यामुळे त्याची इंधन कार्यक्षमता वाढते. रॉकेटला ऊर्जा देण्यासाठी यात तीन सॉलिड-फ्यूल स्टेज आणि एक लिक्विड ऑर्बिटल अॅडजस्टमेंट मॉड्युल देण्यात आले आहे. या रॉकेटला भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ ‘विक्रम-1’ असे नाव देण्यात आले आहे.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाताने लिहिलेले एक पोस्टकार्ड देखील रॉकेटमध्ये पाठवण्यात आले आहे, ज्यावर ‘वंदे मातरम्’ हे शब्द कोरलेले आहेत. या यशस्वी चाचणीनंतर मोदी यांनी स्कायरूटच्या एअरोस्पेसच्या संस्थापकांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. देशातील पहिले खासगी रॉकेट विक्रम-1 च्या यशस्वी चाचणीमुळे देशाच्या आत्मनिर्भरता मोहिमेला बळ मिळेल, असे मोदींनी म्हटले आहे.

























































