रामरक्षा म्हणणं हे तुमचं काम, राम‘रक्षा’ करणं हे आमचं काम; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिराच्या लुटीविरोधात नागपूरमध्ये आज रामरक्षा आणि महाआरतीचा गजर घुमला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला रामभक्त आणि शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या जनसमुदायाच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी देणगी चोरांवर व त्यांना पाठीशी घालणाऱयांवर जोरदार हल्ला चढवला. रामरक्षा पाठांतराचे सल्ले देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘रामरक्षा म्हणणं हे तुमचं काम आहे, तर राम रक्षा करणं हे आमचं काम आहे, असे ठणकावतानाच मंदिर चोरीचा विषय धसास लागत नाही तोपर्यंत सोडणार नाही. अयोध्या आणि काशी विश्वनाथासमोरही आंदोलन करणार, अशी घोषणाच उद्धव ठाकरे यांनी केली.

राम मंदिरातील चोरीविरोधात शिवसेनेने सुरू केलेल्या रामरक्षा आंदोलनाचा दुसरा टप्पा आज नागपूरपासून सुरू झाला. राम नगरमधील राम मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. रामरक्षा स्तोत्र पठण व महाआरतीनंतर उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर घणाघाती टीका केली. ‘राम मंदिरातील चोरी ही एकमेव नाही. केदारनाथ, बद्रीनाथमध्येही चोरी झाली आहे. उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला, अयोध्येत जमीन घोटाळा झाला, अयोध्येत मंदिराच्या नावाने स्वस्तात जमिनी खरेदी करून शतपटीने किमती वाढवून ट्रस्टला विकल्या गेल्या. भाजपच्या या कारभारामुळे रामभक्तांना प्रभू रामाचे रक्षण करण्याची वेळ आली आहे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. ज्या पद्धतीने भाजप वागत आहे ते पाहता यांच्यात श्रीरामाऐवजी सैतानाचा आत्मा घुसला की काय असा प्रश्न पडतो,’ अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. रामरक्षा आंदोलनाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, सुनील प्रभू, अंबादास दानवे, नितीन देशमुख, सूरज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेते सुनील केदार, काँग्रेस खासदार शाम बर्वे, राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये, सलील देशमुख आदी उपस्थित होते.

एसआयटी हे थोतांड, निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी!

मंदिर चोरीप्रकरणी स्थापन केलेली एसआयटी हे थोतांड आहे. नाटक आहे. या प्रकरणाचा निकाल लावायचा असेल तर निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करा. हे न्यायमूर्तीसुद्धा गोगलगायीसारखे नकोत. आरत्या ओवाळणारे नकोत. निःस्पृह आणि निष्पक्षपातीपणे काम करणारे अभय ओकांसारखे न्यायाधीश नेमा. मग ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘हा फक्त मंदिरावरचा किंवा दानपेटीवरचा दरोडा नाही, तमाम हिंदूंच्या भावनेवर, श्रद्धेवर घातलेला हा दरोडा आहे. आता जनतेनेच न्यायाधीश होण्याची वेळ आली आहे. जगातल्या प्रत्येक हिंदूने न्यायाधीश बनून मंदिर चोरीचा न्यायनिवाडा करायला हवा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भाजपमुक्त राम हवा!

‘आम्हाला भाजपमुक्त राम पाहिजे. त्या भाजपमुक्त राम आंदोलनाची ही सुरुवात आहे. हा लढा मुंबई, नागपूरपुरता मर्यादित राहणार नाही. हा लढा गावोगावी, खेडोपाडी नेला पाहिजे. मागे हटणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘निवडणुकीत गरजेपुरतं लोकांना वापरायचं आणि फेकून द्यायचं ही भाजपची नीती आहे. आता तर श्रीरामालाही फेकून दिलं आहे. असे नीच राज्यकर्ते कधी झाले नाहीत,’ असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार?

सोनम वांगचुक यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱया सरकारवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘भाजपचा आणि राज्यकारभाराचा दुरान्वयेही संबंध नाही. परीक्षा नीट घेता येत नाही. आंदोलन नीट हाताळता येत नाही. ज्या पद्धतीनं भाजप सरकार क्रूरपणे युवकांच्या भवितव्याशी खेळतंय, ते अत्यंत लज्जास्पद आहे. सरकारला वांगचुक यांच्या प्रकृतीची एवढी काळजी होती, तर आधीच त्यांच्याशी बोलायला हवे होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं आहे? इतक्या चुका करूनही त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? आणखी किती बळी घेतल्यानंतर सरकार प्रधान यांचा राजीनामा घेणार आहे,’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

वांगचुक यांना न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णालयात दाखल केल्याच्या पोलिसांच्या दाव्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार झाली असेल, तर पोलिसांनी तो आदेश सार्वजनिक करावा. महात्मा गांधींपासून अण्णा हजारे यांच्या आंदोलनापर्यंत अनेक उपोषणे झाली, त्यावेळी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने वांगचुक यांच्याशी चर्चा करावी, असे ते म्हणाले.

सर्व पक्षांच्या सर्व भाषिकांना आवाहन

वांगचुक यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्या आंदोलन करत आहे. देशाचे भविष्य असलेल्या युवकांचा हा लढा आहे. सर्व पक्षांच्या सर्व भाषिकांना या लढय़ात सहभागी व्हायला हवे. ज्यांना युवकांबद्दल आस्था आहे. ज्यांना दडपशाही मंजूर नाही. त्या सर्वांनी उद्या तिथे यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

मंदिराच्या तिजोऱ्या फोडणारे हिंदुत्व हवे का?

‘भाजप ज्या पद्धतीने वागत आहे. पेपर फुटत आहेत, पक्ष फोडले जात आहेत, आता मंदिरातील तिजोऱया पह्डल्या जात आहेत. हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला. भाजपचा विधानसभा अध्यक्ष लोकांच्या भावना दुखावणारं बोलत असतानाही भागवत यांना काही वाटत नसेल तर त्यांचे हिंदुत्व ढोंगी आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. आमच्या हिंदू राष्ट्रात रामराज्य अपेक्षित आहे, शिवशाही अपेक्षित आहे. गोरगरीबांना विद्यार्थ्यांना न्याय देणारं आमचं हिंदू राष्ट्र आहे. कंत्राटदारांना अभय देणारं हे आमचं हिंदू राष्ट्र असू शकत नाही. हिंदूंनी दोन ते तीन अपत्य जन्माला घातली पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले होते. आता आहेत त्या अपत्यांच्या परीक्षेचे पेपर फुटले, अनेकांनी आत्महत्या केल्या, त्याचं काय करणार? आणखी अपत्य जन्माला घालून तुम्ही त्यांनाही असेच चिरडणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

अयोध्येतील राम मंदिर करोडो हिंदूंच्या भावनेतून उभे राहिले आहे. त्यावर पडलेला दरोडा हा केवळ दानपेटीवरचा दरोडा नाही, हिंदूंच्या भावनेवरचा आणि श्रद्धेवरचा दरोडा आहे. म्हणूनच आम्ही रामरक्षा आंदोलन करण्याचा लढा आजपासून सुरू करतोय. चोरांनो मधे येऊ नका.

रामरक्षा येते म्हणून चोरी माफ होत नाही!

फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार आसुड ओढले. ‘वर्गातल्या मॉनिटरसारखे वागून शब्दांचे खेळ करू नका. मला रामरक्षा स्तोत्र येत नसेल, पण मला रामाची रक्षा करायला येते. तुम्हाला रामरक्षा म्हणता येते म्हणून चोरी माफ होणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. रामभक्त विरुद्ध राम मंदिर चोर असा लढा आहे. फडणवीस आणि भागवत हे रामभक्तांच्या बाजूने आहेत की चोरांच्या, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राम मंदिर तुमच्या बापाची जहागिरी नाही!

ज्यांची श्रद्धा खोटी होती त्यांचे पैसे चोरीला गेले. ज्यांना पैसे परत हवेत त्यांना द्यायला आम्ही तयार आहोत, असे म्हणणारे भाजपचे उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांचा उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला. ‘राम मंदिर तुमच्या बापाची जहागिरी नाही. आम्हीही रामभक्त आहोत,’ असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. आजच्या आंदोलनाचे आमंत्रण आम्ही सर्वांना दिले होते. फडणवीस, भागवत यांनाही दिले होते. काँग्रेसचे लोकही आज माझ्यासोबत आहेत. इथे फक्त रामभक्त आहेत. भाजपचे कोणीही नाही. मग हिंदुत्व कोणी सोडलंय?,’ असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.