ज्येष्ठ गांधीवादी नेते, युक्रांदचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक आणि ‘युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.  त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, दोन भाऊ आणि दोन बहिणी, मुलगा डॉ. कबीर सप्तर्षी आणि सून, नातू असा परिवार आहे.सप्तर्षी यांच्या निधनाने समाजवादी आणि गांधीवादी चळवळीतील एक पर्व हरपले आहे.

डॉ. सप्तर्षी यांना शनिवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. सप्तर्षी यांच्या पार्थिवावर 20 जुलै रोजी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी कोथरूड गांधी भवन येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

समाजवादाचे पुरस्कर्ते

समाजपरिवर्तनाची चळवळ उभारणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला. युवकांना संघटित करून सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली होती. युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली. ते केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर ते एक प्रभावी लेखक, अभ्यासू विचारवंत आणि वक्ते म्हणूनही ओळखले जात होते.