
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या राम नगरातील राम मंदिरात आज शिवसेनेच्या महाआरतीचा गजर घुमला. अयोध्येतील राम मंदिराच्या लुटीचा निषेध करण्यासाठी हे भव्य आंदोलन करण्यात आले. जय श्रीराम… सियावर रामचंद्र की जय… अशा गगनभेदी घोषणांनी राम नगरी यावेळी दुमदुमून गेली. भाजपच्या राजवटीत राम मंदिरावर पडलेल्या दरोड्याचा जाब विचारण्यासाठी संपूर्ण विदर्भातून रामभक्तांनी नागपुरात गर्दी केली होती. नागपूरकर जनताही मोठ्या संख्येने शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झाली. भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून शिवसैनिक महाआरतीत सहभागी झाले. यावेळी रामरक्षा स्तोत्र पठणही करण्यात आले. हिशेब द्या, हिशेब द्या… राम मंदिर चोरीचा हिशेब द्या… अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भगव्या तेजाने नागपूर नगरी दुमदुमली
शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलक भगव्या टोप्या, उपरणी आणि भगवी वस्त्रे परिधान करून सहभागी झाले होते. यामध्ये महिला, वृद्धांसह मुलांचाही मोठा सहभाग होता. ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ असा मजकूर टोप्यांवर होता. अनेकजण हाती मारुतीरायाची गदा उंचावत होते. श्री प्रभू राम चंद्र की जय अशा आशयाच्या उपरणी, फलक आंदोलक डौलाने फडकवत होते. आंदोलन परिसरात जागोजागी भगवे झेंडे झळकत होते. त्यामुळे अवघी नागपूरनगरी भगव्या तेजाने उजळून गेली. जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणांनी नागपूर दुमदुमून गेले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राम नगरातील राम मंदिरात महाआरती करण्यात आली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, नितीन देशमुख, देवस्थानचे रवी वाघमारे, राजू काळेले हेही महाआरतीमध्ये सहभागी झाले.
शिवसेनेच्या आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरील फलकावर प्रभू श्री रामांची सावलीच्या स्वरूपात आकर्षक छायाचित्र साकारण्यात आले होते. हाती धनुष्यबाण असलेल्या या छायाचित्रातून प्रचंड तेज पसरत असल्याचाच भास होत होता.
नागपूरच्या राम नगरमधील राम मंदिरात जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. देवस्थानचे अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजू काळेले यांनी देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
आंदोलनस्थळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तेजस्वी छबी असलेले कटाऊट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आंदोलकांनी शिवसेनाप्रमुखांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले.
शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनात महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यामध्ये मुस्लिम महिलांनीही जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सर्वधर्मीयांचा सहभाग होता.
शिवसेनेच्या आंदोलनस्थळावर भगवी पताका फडकणारा तेजस्वी ध्वज डौलाने फडकणारी प्रतिकृती लक्षवेधक ठरली. धर्मध्वजावर तेजस्वी सूर्यही झळकत होता.
नागपूरमध्ये सर्व रस्त्यांवर रामरक्षा, महाआरती आंदोलनाचे फलक झळकत होते.

































































