
डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि परिचारिकांना केलेल्या बेदम मारहाणीचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने सोमवारपासून २४ तास राज्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात ओपीडी सेवा देखील ठप्प राहणार आहेत. मात्र आपत्कालीन सेवा, प्रसूती सेवा जीवनावश्यक उपचार सुरू ठेवण्यात येणार आहेत.
आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या व्यवस्थेवर केलेला हा हल्ला आहे. अशा हिंसाग्रस्त वातावरणात रुग्णसेवा देणे कठीण असल्याने अशाप्रकारच्या हल्लेखोरांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने तातडीने प्रयत्न व्हावेत. या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप दूर करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ या वेळेत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
तर ९ ऑगस्टपासून बेमुदत संप
आयएमएच्या विविध मागण्यांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीतर महाराष्ट्रातील आयएमएसह विविध संघटनांचे डॉक्टर ९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जातील, असा इशारा ‘आयएमए’चे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई, राज्य खजिनदार डॉ. अमोल गिते यांनी दिला आहे.



























































