
मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवार सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू असून काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील लोकल साधारण 10 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर दुसरीकडे या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठा 88 टक्क्यांवर पोहोचला आहे. बृहंमुंबई महापालिकेने एक्सवर ट्विट करत याबाबत माहिती दिली.
हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट दिलेला असून शुक्रवार सकाळपासून मुंबई शहर, उपनगरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने रस्ते, रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल वाहतूक 10 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत असून रस्ते वाहतूकही मंदावली आहे.
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल #MyBMCUpdates pic.twitter.com/HVg4Em4Cb8
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 31, 2026
धरणातील पाणीसाठा 88 टक्क्यांवर पोहोचला
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 88 टक्क्यांवर पोहोचला आहे. मोडक सागर, विहार तलाव, तुलसी तलाव आणि तानसा तलाव हे ओव्हरफ्लो झाले आहेत. तर अप्पर वैतरणा 76.64 टक्के, मध्य वैतरणा 89.83 टक्के आणि भातसा 87.36 टक्के भरले आहे.
तलाव क्षेत्रामध्ये मुसळधार
गेल्या 24 तासांपासून तलाव क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असून क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद अप्पर वैतरणा येथे (68 मिमी) झाली. त्यापाठोपाठ मध्य वैतरणा (36 मिमी), तुलसी (21 मिमी), मोडक सागर (14 मिमी), विहार (12 मिमी), भातसा (11 मिमी) आणि तानसा (10 मिमी) येथे पावसाची नोंद झाली.



























































