
म्हाडाची 2640 घरांसाठीची संगणकीय सोडत आज पार पडली. मात्र या सोडतीत ज्यांना घर लागले नाही त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. कारण अवघ्या सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी 2027 मध्ये मुंबई मंडळाची घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली जाईल, असे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबईतील घरांच्या विक्रीसाठी पार पडलेल्या संगणकीय सोडतीवेळी ते बोलत होते. जयस्वाल पुढे म्हणाले, गेल्या तीन वर्षांमध्ये म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांनी सुमारे 25 सोडतींचे आयोजन करून सुमारे 50 हजार सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘ग्रोथ हब’मध्ये मुंबई महानगर प्रदेशाचा समावेश असल्यामुळे 30 लाख घरांचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. यापैकी म्हाडाने साडेसात लाखांहून अधिक घरांचे उद्दिष्ट स्वीकारले आहे. गेल्या आठवडय़ात याबद्दलचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आले आहे. नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये फक्त घरे बांधणे या हेतूबरोबर आता वर्किंग वुमन हॉस्टेल, वृद्धाश्रम, विद्यार्थी वसतिगृहे आणि औद्योगिक कामगारांसाठी घरे या सर्व बाबींचा समावेश केला आहे. तसेच भाडेतत्त्वावरील गृहनिर्मिती मुंबईची गरज असून त्या अनुषंगाने पोर्टल तयार केले जात आहे.
समूह पुनर्विकासातून म्हाडाला 30 हजार घरे
मुंबईमध्ये एकूण 925 एकर जागेवर समूह पुनर्विकास प्रकल्पाद्वारे पुढच्या सात वर्षांमध्ये गृहनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यामध्ये साधारणपणे 65 हजार लोकांचे पुनर्वसन होईल. म्हाडाच्या वाटय़ाला सुमारे 30 हजार घरे प्राप्त होणार असून विकासकांना सुमारे एक लाखांहून अधिक घरे या क्लस्टर योजनेमुळे उपलब्ध होतील, असेही जयस्वाल यांनी सांगितले.


























































