
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील बनवण्याचा प्रयत्न एसटी महामंडळातील तीन कर्मचाऱ्यांना चांगलाच महागात पडला आहे. पनवेल आगारातील महिला वाहक नंदा कोळी यांच्यासह वाहतूक नियंत्रक विजय माने आणि सुनील देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या रीलला साडेसात लाख व्ह्यूज मिळाले असले तरी त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.
महिला वाहक नंदा कोळी यांनी एसटीच्या गणवेशात पनवेल आगारातील नियंत्रण कक्षात रील तयार केली होती. या व्हिडीओमध्ये वाहतूक नियंत्रक विजय माने आणि सुनील देशमुख हेही सहभागी होते. नियंत्रक विजय माने यांनी गुलाबाचे फूल देतानाचे दृश्य व्हायरल झाले होते. संबंधित रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिली गेली असून फेसबुकवर साडेसात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.
व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतर मुंबई विभागाने संबंधित तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर शिस्तभंगाची कारवाई करत तिघांचे निलंबन करण्यात आले. कर्तव्यावर असताना रील, व्हिडीओ, लाइव्ह स्ट्रीमिंग, युट्यूब शॉर्ट्स किंवा अन्य सोशल मीडिया सामग्री तयार करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे लेखी आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
व्हिडीओ तयार करण्यासाठी परवानगी बंधनकारक
महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आगार, बस स्थानक, कार्यालय किंवा एसटी बसमध्ये गणवेश परिधान करून कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच महामंडळाची प्रतिमा मलिन होईल किंवा नकारात्मक संदेश जाईल, अशी सामग्री प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे. महामंडळाच्या प्रवासी सुविधा, योजना, स्वच्छता किंवा इतर उपक्रमांबाबत व्हिडीओ तयार करायचा असल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.





























































